राजकीय

AI-जनरेटेड बनावट व्हिडिओद्वारे बदनामी केल्याचा आरोप जय पाटील यांची बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

AI-जनरेटेड बनावट व्हिडिओद्वारे बदनामी केल्याचा आरोप

AI-जनरेटेड बनावट व्हिडिओद्वारे बदनामी केल्याचा आरोप जय पाटील यांची बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

AI-जनरेटेड बनावट व्हिडिओद्वारे बदनामी केल्याचा आरोप

बारामती वार्तापत्र 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ प्रसारित करून राजकीय बदनामी केल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे बारामती शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जय नानासो पाटील (वय 42) यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

जय पाटील हे गुरुकृपा कॉम्प्लेक्स, तांदुळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे वास्तव्यास असून शेती व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कायद्याचे पालन करणारा नागरिक म्हणून आपण पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून तक्रार दाखल केल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तक्रारीनुसार, दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.18 ते 7.00 वाजण्याच्या दरम्यान, बारामतीतील भिगवण चौक परिसरात असताना मोहसीन खान पठाण (रा. सुर्यनगरी MIDC, बारामती) यांनी जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक व दुर्भावनेने AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट डिजिटल व्हिडिओ व फोटो तयार केले. हे व्हिडिओ खरे असल्याचा आभास निर्माण करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे.

जय पाटील यांच्याबाबत स्वतंत्र AI-जनरेटेड व्हिडिओ तयार करून त्यामध्ये खोटे, आरोपात्मक व बदनामीकारक भाष्य करण्यात आले आहे. या व्हिडिओद्वारे त्यांची राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन करणे, मतदारांमध्ये संशय निर्माण करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करणे हा स्पष्ट उद्देश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आरोपांना कोणताही तथ्यात्मक अथवा कायदेशीर आधार नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक 2 (अ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिनविरोध उमेदवार सौ. अनुप्रिता डांगे यांचे पती अक्षय डांगे यांच्याबाबतही पैसे मोजत असल्याचा AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ व फोटो तयार करून तो खरा असल्याप्रमाणे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओमध्ये “निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला जात आहे, मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे वाटप केले जात आहेत,” असा खोटा, अप्रमाणित व बदनामीकारक मजकूर दाखवण्यात आला आहे.

सदर बनावट व्हिडिओ व मजकूर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आले असून, त्याच आशयाचा मजकूर ई-मेलद्वारे निवडणूक आयोग, शासकीय कार्यालये व प्रसारमाध्यमांनाही पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे जय पाटील व अक्षय डांगे यांच्या सामाजिक व राजकीय प्रतिमेला गंभीर धक्का बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

निवडणूक काळात अशा खोट्या व बनावट प्रचारामुळे मतदारांमध्ये गैरसमज, संशय व असंतोष निर्माण होण्याची दाट शक्यता असून निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा उद्देशही या कृत्यामागे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोहसीन खान पठाण यांनी डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून जाणीवपूर्वक बदनामी व निवडणूक प्रक्रियेवर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जय पाटील व अक्षय डांगे यांनी पोलिसांकडे केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये या तक्रारीवर पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

Back to top button