काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी इंदापूर शहर काँग्रेस कडून निषेध व्यक्त
भाजपा हटावो बेटी बचाओ च्या दिल्या घोषणा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी इंदापूर शहर काँग्रेस कडून निषेध व्यक्त
भाजपा हटावो बेटी बचाओ च्या दिल्या घोषणा
इंदापूर:- बारामती वार्तापत्र
हाथरस मधील बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्की व लाठीमाराचा तीव्र निषेध इंदापूर शहर काँग्रेस कडून इंदापूर नगरपालिकेसमोर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी भाजपा शासन काळात महिला सुरक्षित नसल्याची टीका केली.
हाथरस प्रकरणातील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसकडे जात असताना ग्रेडर नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवेवर उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना अटक केली. तसेच त्याठिकाणी लाठीमार केल्याचा आरोपही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी आपण कायद्याच्या कोणत्या कलमाचे उल्लंघन केले असा सवाल राहुल गांधी यांनी पोलिसांनी विचारला.
प्रियंका गांधी यांनी या घटनेनंतर ट्वीटरवरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना, एक घमेंडखोर सत्ता निष्पाप मुलींच्या मृतदेहावर आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत आहे. अन्याय रोखण्याऐवजी स्वतःच अन्याय करत आहे. महिलांना एक सुरक्षित समाज आणि प्रदेश मिळण्यासाठी, त्यांना स्वतंत्र होऊन प्रगती करता येईल अशी स्थिती येण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, असं ट्वीट केलं आहे.
या घटनेमुळे संपूर्ण देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप असून, भाजपा सत्तेत आल्यापासून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. भाजपा शासन काळात महिला असुरक्षित झाल्या असून, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ऐवजी आता ‘भाजपा हटाओ बेटी बचाओ’, ‘भाजपा हटाओ देश बचाओ’ अशी घोषणा देण्याची वेळ आली असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी केली आहे.
हाथरस प्रकरणामध्ये पीडितेच्या कुटुंबीयांच्या वेदनेवर फुंकर घालण्याची गरज असताना योगींच्या उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांचा विरोध झुगारत तिच्या मृतदेहावर रातोरात अंत्यसंस्कार उरकले होते. ज्यानंतर या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला होता. यूपी पोलिसांच्या या संशयास्पद कृत्याचा आणि राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा काँग्रेसचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी तीव्र निषेध नोंदवला. यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘भाजपा हटाओ बेटी बचाओ’ ‘भाजपा हटाओ देश बचाओ’, च्या घोषणा दिल्या.