शैक्षणिक

एक दिवसीय जिल्हास्तरीय मूल्यशिक्षण कार्यशाळा, लिंगभाव संवेदनशीलता: जाणीव व समानता या विषयावर संपन्न

एकुन 160 स्वयंसेवक सहभागी

एक दिवसीय जिल्हास्तरीय मूल्यशिक्षण कार्यशाळा, लिंगभाव संवेदनशीलता: जाणीव व समानता या विषयावर संपन्न

एकुन 160 स्वयंसेवक सहभागी

बारामती वार्तापत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील सेमिनार हॉल (प्रशासकीय इमारत ) येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय मूल्यशिक्षण कार्यशाळा, लिंगभाव संवेदनशीलता : जाणीव व समानता या विषयावर आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप अध्यक्ष म्हणुन व  प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.किशोरी ताकवले (शरदचंद्र पवार महाविद्यालय, जेजुरी) लाभल्या.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अविनाश जगताप सर यांच्या हस्ते प्रा.किशोरी ताकवले यांच्या उपस्थितीत पार पडले.

सदर कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. प्रथम सत्रात प्रा.किशोरी ताकवले यांनी स्री व पुरुष यांच्यामधील गुणवैशिष्ट्ये, साधर्म्य, वेगळेपण यासंदर्भात माहिती दिली.

पुरूषप्रधान समाजव्यवस्थेतील सामाजिक एकांगीपणामुळे निर्माण झालेल्या रूढी परंपरांमुळे स्त्रियांवर होणारा अन्याय विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितला. दुपारच्या सत्रात स्री व पुरुषातील नैसर्गिक व सामाजिक मर्यादा व बलस्थाने याविषयी सहज चर्चा केली.

लिंगभाव समानता साधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पूरकतेविषयी सखोल चर्चा व मार्गदर्शन करताना येणाऱ्या भारतीय समाज व्यवस्थेत स्त्री पुरुषांनी एकमेकांना पूरक असे सहजीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे मानसिक बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

समाजाने घालून दिलेल्या रुढीपरंपरानुसार आंधळेपणाने जीवन जगलो तर पदोपदी असमानता, उपेक्षा, अस्थिरता ,अस्वस्थता, आणि अन्याय इतर भिन्नलिंगी व्यक्तींवर होत असल्याचे त्यांनी अनेक उदाहरणातून पटवून दिले. जीवनात परस्पर पूरकतेचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.

अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी उद्याच्या भारताच्या समृद्ध विकास स्त्री पुरुष समानता व त्यांच्यामध्ये असणारे पूरकतेचे नाते व त्या विषयाची आवश्यकता किती गरजेचे आहे यावर भाष्य केले. उद्याचा भारत घडविण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान तसेच शैक्षणिक क्षेत्रात मूल्यशिक्षण व त्याचे महत्त्व पटवून देताना सदर कार्यशाळेची आवश्यकता नमूद केली.

सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.विलास कर्डिले (जिल्हा समन्वयक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना ) यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अस्मिता भगत यांनी केले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु.सरगम जगदाळे, सिद्धी फाळके, कु.भरत जाधव व श्री.सोमनाथ कदम यांनी केले.  कार्यशाळेस बारामती शहर, तालुका, पुणे शहर व इंदापूर तालुका येथील महाविद्यालयातील एकुन 160 स्वयंसेवक सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!