बारामतीतील ‘अनेकान्त’मध्ये हिंदीचा जल्लोष! ‘भाषा व्याकरणाचा मेळा’ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
विद्यार्थ्यांनी मांडले ज्ञानाचे रंगीबेरंगी विश्व

बारामतीतील ‘अनेकान्त’मध्ये हिंदीचा जल्लोष! ‘भाषा व्याकरणाचा मेळा’ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
विद्यार्थ्यांनी मांडले ज्ञानाचे रंगीबेरंगी विश्व
बारामती वार्तापत्र
अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी विभागाच्या वतीने ‘भाषा व्याकरणाचा मेळा’ या विषयावर विशेष हिंदी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड व प्रेम निर्माण करणे, तसेच व्याकरणातील संकल्पना अधिक सर्जनशील, रंजक आणि कृतीशील पद्धतीने समजावून देणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामतीचे हिंदी विभागप्रमुख डॉ. सरवदे प्रदीप रेवाप्पा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांची व प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत हिंदी भाषेचे महत्त्व आणि भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हिंदीच्या अभ्यासाची उपयुक्तता याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदी व्याकरणातील विविध घटकांवर आधारित मॉडेल्स, चार्ट्स, पोस्टर्स तसेच हिंदी साहित्याशी संबंधित विविध सादरीकरणे तयार केली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांची माहिती आत्मविश्वासाने उपस्थितांसमोर मांडत विषयाचे सखोल आकलन आणि सर्जनशीलता दाखवून दिली.
विद्यालयाच्या प्राचार्या प्रणाली वडेर तसेच सर्व शिक्षकवृंदाने प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कल्पक मांडणीमुळे हिंदी व्याकरणासारखा विषयही मनोरंजक पद्धतीने शिकता येतो, हे या प्रदर्शनातून अधोरेखित झाले.
हिंदी विभागातील शिक्षिका तसेच विद्यालयातील सर्व सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांसाठी हा हिंदी दिन सोहळा ज्ञानवर्धक, सर्जनशील आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.






