भरणेवाडीत मोफत वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ; पशुपालकांना चारा टंचाईतून दिलासा!
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात; बोरी-वालचंदनगर गटातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन...

भरणेवाडीत मोफत वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ; पशुपालकांना चारा टंचाईतून दिलासा!
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात; बोरी-वालचंदनगर गटातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…
इंदापूर,-
पशुधनाला सकस व दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा, दुग्धोत्पादनात वाढ होऊन पशुपालक शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न बळकट व्हावे, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैरण विकास कार्यक्रमांतर्गत मोफत वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ रविवारी (ता. १) भरणेवाडी येथे करण्यात आला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. या योजनेमुळे बोरी-वालचंदनगर गटातील पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भरणेवाडी येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना उन्नत व सुधारित जातीच्या वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जनावरांना वर्षभर पुरेसा आणि पौष्टिक चारा मिळावा, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी तसेच दुग्धोत्पादनाची क्षमता वाढावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विशेषतः चारा टंचाईच्या संभाव्य परिस्थितीत पशुपालकांना या योजनेचा मोठा आधार मिळणार आहे.
सकस वैरणीतून दुग्धव्यवसायाला बळ
दुग्धव्यवसायात जनावरांच्या आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जनावरांना संतुलित व सकस आहार मिळाल्यास त्यांच्या आरोग्यासोबतच दूध उत्पादन आणि दुधातील फॅट व एसएनएफचे प्रमाण सुधारण्यास मदत होते. त्यामुळे सुधारित जातीच्या वैरण बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात पौष्टिक चारा पिकविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. परिणामी चाऱ्यावरील खर्च कमी होऊन दुग्धव्यवसाय अधिक किफायतशीर होण्यास मदत होणार आहे.
सातबारा व ओळखपत्राची प्रत जमा करा!
या योजनेचा परिसरातील जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद सदस्या निर्मला मिसाळ यांनी केले. त्या म्हणाल्या, “दुधाचा दर्जा आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी सकस वैरण हाच खरा पाया आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. परिसरातील शेतकरी बांधवांनी जवळच्या पशुसंवर्धन दवाखान्यात जाऊन संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे शेतीचा सातबारा उतारा आणि ओळखपत्राची प्रत जमा करावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद सदस्या तथा कृषी विभागाच्या सदस्या निर्मला मिसाळ, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन लोंढे, पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे, माजी सभापती डॉ. नंदकुमार सोनवणे, सागर मिसाळ, डॉ. शिंदे, डॉ. प्रतीक जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






