शैक्षणिक

‘एक मूठ धान्य’ उपक्रमातून विद्या प्रतिष्ठान शाळेने जपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श!

विद्यार्थ्यांमध्ये करुणा, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन

‘एक मूठ धान्य’ उपक्रमातून विद्या प्रतिष्ठान शाळेने जपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श!

विद्यार्थ्यांमध्ये करुणा, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन

बारामती वार्तापत्र 

विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) शाळेच्या वतीने ‘एक मूठ धान्य’ या सामाजिक उपक्रमातून गरजू व्यक्तींना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये करुणा, दानशूर वृत्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी शाळेच्या इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या समन्वयाने राबविण्यात येतो.

यावर्षीही शिशुगट आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत धान्य आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आणलेल्या धान्याचे शाळेत संकलन करण्यात आले. हे धान्य रोटरी क्लबच्या सहकार्याने परिसरातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात येते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना गरजूंच्या मदतीचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजण्याची संधी मिळाली.

‘एक मूठ धान्य, माणुसकीचा आधार!’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ भिगवणचे संजय खाडे, रियाज शेख, नामदेव कुदळे आणि संजय चौधरी यांनी पुढाकार घेतला. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत उपक्रमात सहकार्य केले.

अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहकार्याची भावना, दानशूर वृत्ती आणि मानवतेची मूल्ये रुजण्यास मदत होते. योग्य मार्गदर्शन आणि सर्वांच्या सहभागामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला, असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्या डॉ. सरिता शिंदे यांनी केले.

‘एक मूठ धान्य’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देत गरजूंच्या मदतीसाठी माणुसकीचा हात पुढे केला.

Back to top button