कृषी

बारामतीच्या कृषी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय करिअरची दिशा! ऋषिकेश मोहिते यांचे प्रेरणादायी व्याख्यान

‘नोकरी शोधणारे नव्हे, रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बना!’

बारामतीच्या कृषी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय करिअरची दिशा! ऋषिकेश मोहिते यांचे प्रेरणादायी व्याख्यान

‘नोकरी शोधणारे नव्हे, रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बना!’

बारामती वार्तापत्र 

बदलत्या जागतिक परिस्थितीत कृषी क्षेत्रात करिअरच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. कृषी पदवीधरांनी पारंपरिक नोकऱ्यांपुरते मर्यादित न राहता उच्च शिक्षण, संशोधन, कृषी उद्योग, व्यवस्थापन, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचा वेध घ्यावा, असे प्रतिपादन टॉर्क कमोडिटीज प्रा. लि., सेनेगल, पश्चिम आफ्रिका येथील असिस्टंट मॅनेजर ऋषिकेश मोहिते यांनी केले.

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर अँड अलाईड सायन्सेस, बारामती येथील प्लेसमेंट सेलच्या वतीने ‘बी.एस्सी. ॲग्री. आणि बी.एस्सी. एबीएमनंतर करिअर व उच्च शिक्षणाच्या संधी’ या विषयावर विशेष मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहिते यांनी विद्यार्थ्यांना पदवीनंतर उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची माहिती दिली.

एम.एस्सी. कृषी, एमबीए ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, पीजीडीएम तसेच कृषी अर्थशास्त्र, कृषी विपणन, अन्नप्रक्रिया, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांसारख्या क्षेत्रांत उच्च शिक्षणाच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रवेशप्रक्रिया, स्पर्धा परीक्षा आणि आवश्यक पूर्वतयारीबाबत मार्गदर्शन केले.

कृषी पदवीधरांना बँकिंग, कृषी वित्तपुरवठा, कृषी निविष्ठा उद्योग, कृषी विपणन, कृषी निर्यात, अन्नप्रक्रिया आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यूपीएससी, एमपीएससी व बँकिंग परीक्षांद्वारे शासकीय सेवेतही करिअर घडविता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. आफ्रिका आणि इतर देशांमध्ये कृषी व्यवसाय, कृषिमाल व्यापार, लॉजिस्टिक्स व निर्यात क्षेत्रातही संधी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी विषयाचे ज्ञान, इंग्रजी संभाषणकौशल्य, संगणकीय साक्षरता, व्यवस्थापन क्षमता आणि विविध संस्कृतींशी जुळवून घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा. कृत्रिम बुद्धिमत्ता व स्टार्टअप्सचा उपयोग करून केवळ नोकरी शोधण्याऐवजी रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्ता तथा सचिव सुनंदा पवार, संस्था समन्वयक आणि मानव संसाधन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button