राज्य बदलून लपले, पण पोलिसांच्या तावडीत सापडले! सर्व्हे मशीन चोरांना अटक
हरियाणा ते पुणे धडक कारवाई; सर्व्हे मशीन चोरीप्रकरणी दोघे जेरबंद, तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राज्य बदलून लपले, पण पोलिसांच्या तावडीत सापडले! सर्व्हे मशीन चोरांना अटक
हरियाणा ते पुणे धडक कारवाई; सर्व्हे मशीन चोरीप्रकरणी दोघे जेरबंद, तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिक्रापूर, प्रतिनिधि
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील कंपनीतून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशीन चोरी करणाऱ्या आरोपींचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरीनंतर आरोपींनी राज्याबाहेर आणि पुण्यात आश्रय घेतला होता. मात्र, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला हरियाणा राज्यातून, तर दुसऱ्याला पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून ताब्यात घेत अटक केली. आरोपींकडून तीन लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
डिंग्रजवाडीतील कंपनीतून सर्व्हे मशीन चोरी
डिंग्रजवाडी येथील इगवुड प्रा. लि. स्कॅलार स्पेसेस कंपनीमधून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे सर्व्हे मशीन चोरीला गेले होते. चोरी झालेल्या मशीनची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी संग्राम शामराव मोरे (वय ४४, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१), ३०५, ३१७(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासी अधिकारी पोलीस हवालदार अजित इंगवले आणि गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान हरी किशन जाटो (वय २४, रा. जोधपूर, राजस्थान) याला हरियाणा राज्यातून, तर अफाकजुद्दीन मुंताजिमुद्दीन काझी (वय ३६, रा. खडकी) याला विश्रांतवाडी, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींकडून तीन लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
सर्व्हे मशीन चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असली, तरी आरोपींनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत. या तपासातून आणखी काही चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार अजित इंगवले, रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, गणेश कुदळे तसेच पोलीस अंमलदार नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले, ललित चकनारायण आणि मयूर कुंभार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पुढील तपास पोलीस हवालदार अजित इंगवले करीत आहेत.
हरियाणापर्यंत जाऊन आरोपींचा माग काढत चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने शिक्रापूर पोलिसांच्या या आंतरराज्यीय कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.






