बारामती तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! सुपेत चार घरफोड्या; कोयत्यासह चोरटे CCTV मध्ये कैद, पोलिसांचा धाक कुठे?
कोयता हातात घेऊन फिरणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद

बारामती तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! सुपेत चार घरफोड्या; कोयत्यासह चोरटे CCTV मध्ये कैद, पोलिसांचा धाक कुठे?
कोयता हातात घेऊन फिरणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद
सुपे; प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे गावात अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्यांचा धुमाकूळ घातला आहे. सुतारवाडा, गणपती मंदिर परिसर आणि वरच्या पेठेत चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील कपाटे आणि साहित्याची उचकापाचक केली. या घरफोड्यांमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या असून, एका घरातून चक्क ३८ किलो साखरही चोरून नेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांच्या हातात कोयता असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंद घरांना लक्ष्य; सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ
सुतारवाड्यानजीक राहणारे वैभव भोईटे यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटांमधील साहित्य आणि साड्या अस्ताव्यस्त फेकून देत चोरट्यांनी सोन्याची चैन, अंगठी, पैंजण आणि दोन जोडवी असा सुमारे सव्वा दोन तोळे सोन्याचा ऐवज तसेच चांदीच्या वस्तूंवर हात साफ केला.
त्यानंतर गणपती मंदिरानजीक राहणारे सूर्यभान जाधव, वरच्या पेठेतील मशीदजवळ राहणारे रवींद्र चांदगुडे आणि सुदाम नेवसे यांच्या बंद घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. घरांची कुलपे तोडून आत प्रवेश करत कपाटांमधील सामानाची उचकापाचक करण्यात आली. घरातील वस्तू आणि साड्या अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे निदर्शनास आले.
घरात घुसण्यासाठी वेगळीच शक्कल; ३८ किलो साखरेवर डल्ला!
सुदाम नेवसे यांच्या घरात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी वेगळीच शक्कल लढवली. घराच्या पाण्याच्या टाकीकडून चढून जिन्याने खाली उतरत त्यांनी खोलीत प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करत चोरट्यांनी तब्बल ३८ किलो साखर चोरून नेली.
विशेष म्हणजे, साखर घेऊन जाताना चोरट्यांच्या हातात कोयता असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे ही घरफोडी केवळ चोरीची घटना न राहता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
कोयत्यासह चोरटे सीसीटीव्हीत कैद; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
एकाच परिसरातील चार बंद घरांना लक्ष्य करून चोरट्यांनी केलेल्या घरफोड्यांमुळे सुपेतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरांची रेकी करून चोरट्यांनी ही कृत्ये केली असावीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हातात कोयता दिसत असल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, तसेच सुपे परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सुपेतील बंद घरांची सुरक्षा कोणाच्या भरवशावर? चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.






