पोस्टाच्या सेवा-सुविधांबाबत तक्रार आहे? बारामतीत भरणार विभागीय डाक अदालत!
स्पीड पोस्ट, पार्सल, बचत खाते, मनिऑर्डर अन् टपाल सेवांबाबत तक्रारी मांडण्याची संधी; ४ नोव्हेंबरपर्यंत तक्रारी पाठविण्याचे आवाहन

पोस्टाच्या सेवा-सुविधांबाबत तक्रार आहे? बारामतीत भरणार विभागीय डाक अदालत!
स्पीड पोस्ट, पार्सल, बचत खाते, मनिऑर्डर अन् टपाल सेवांबाबत तक्रारी मांडण्याची संधी; ४ नोव्हेंबरपर्यंत तक्रारी पाठविण्याचे आवाहन
बारामती वार्तापत्र
पोस्ट ऑफिसच्या सेवा-सुविधांबाबत तक्रारी आहेत? पोस्टाचे कामकाज, स्पीड पोस्ट, पार्सल, बचत खाते किंवा मनिऑर्डर संदर्भातील तक्रारींचे सहा आठवड्यांनंतरही निराकरण झालेले नाही? अशा नागरिकांसाठी बारामती डाकघर विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय डाकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही डाक अदालत बारामती येथील डाक अधीक्षक कार्यालयात दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
बारामती डाक विभागांतर्गत बारामती, पुरंदर, शिरूर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील संबंधित पोस्ट ऑफिसच्या कार्यपद्धतीविषयी तसेच विविध डाक सेवांबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी या डाकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पोस्टाची सेवा ही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत नागरिकांना टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, बचत योजना आणि आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून पोस्ट विभाग सेवा पुरवितो. मात्र, या सेवा देताना काही वेळा पत्रव्यवहारातील विलंब, टपाल वितरणातील त्रुटी, पार्सल पोहोचण्यास होणारा उशीर किंवा इतर प्रशासकीय अडचणींमुळे नागरिकांना तक्रारींचा सामना करावा लागतो.
अशा तक्रारींचे योग्य आणि वेळेत निवारण व्हावे, तसेच ग्राहकांच्या समस्यांना थेट व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने डाक विभागाकडून डाकअदालतीचे आयोजन केले जाते.
या डाकअदालतीमध्ये ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झालेले नाही किंवा संबंधित विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनिऑर्डर यासंबंधीच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. यामध्ये तक्रारीची तारीख, मूळ तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आली होती, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पदनाम तसेच तक्रारीशी संबंधित आवश्यक कागदपत्रांचा समावेश असावा.
नागरिकांनी आपल्या तक्रारी श्री. केतन डी. शित्रे, डाक अधीक्षक, बारामती विभाग, बारामती – ४१३१०२ यांच्या नावे पाठवाव्यात. सदर तक्रारी दि. ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचतील, अशा पद्धतीने पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नसल्याचे बारामती डाकघर विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे बारामती, पुरंदर, शिरूर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील पोस्टाच्या सेवांबाबत प्रलंबित तक्रारी असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि निर्धारित मुदतीत आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.






