UPSC मध्ये देशात द्वितीय! अंशुमन कुमार सिंह यांचा बारामतीच्या विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याची क्षमता; स्पष्ट ध्येय, कठोर परिश्रम आणि सातत्यावर भर — डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न शास्त्रे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न

UPSC मध्ये देशात द्वितीय! अंशुमन कुमार सिंह यांचा बारामतीच्या विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याची क्षमता; स्पष्ट ध्येय, कठोर परिश्रम आणि सातत्यावर भर — डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न शास्त्रे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न
बारामती वार्तापत्र
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून स्पष्ट ध्येय, कठोर परिश्रम, सातत्य, स्वयंशिस्त आणि योग्य अभ्यास नियोजन आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन भारतीय तटरक्षक दलातील माजी डेप्युटी कमांडंट तथा भारतीय वनसेवा परीक्षा २०२५ मध्ये देशात द्वितीय क्रमांक मिळविणारे श्री. अंशुमन कुमार सिंह यांनी केले.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न शास्त्रे महाविद्यालयातील ॲग्रीकल्चर कॉम्पिटिटिव्ह फोरम आणि वाजीराम अँड रवी – इन्स्टिट्यूट फॉर आयएएस एक्झामिनेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “फ्रॉम कॅम्पस टू सिव्हिल सर्व्हिसेस : युअर रोडमॅप टू सक्सेस” या विषयावर UPSC व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि प्रशासकीय सेवांमधील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अंशुमन कुमार सिंह यांचा विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अंशुमन कुमार सिंह यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीतील स्वतःचे अनुभव सांगितले. अभ्यासात सातत्य राखणे, अपयशातून शिकण्याची वृत्ती विकसित करणे आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे, या बाबी यशासाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धा परीक्षांकडे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वक्षमता आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया म्हणून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केल्यास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळविणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
UPSC परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासाचे नियोजन समजावले
वाजीराम अँड रवी – इन्स्टिट्यूट फॉर आयएएस एक्झामिनेशनचे कृषी विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक श्री. कृष्णा भोकरे यांनी UPSC परीक्षेचे स्वरूप, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत प्रक्रिया आणि अभ्यासक्रमाचे विश्लेषण याविषयी सविस्तर माहिती दिली.
योग्य संदर्भग्रंथांची निवड, उत्तरलेखन कौशल्य, चालू घडामोडींचे विश्लेषण, नियमित उजळणी आणि सराव चाचण्यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कृषी पदवीधरांसाठी प्रशासकीय सेवांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देताना कृषी विषयाचा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास करताना आवश्यक असलेल्या तयारीवरही त्यांनी विशेष भर दिला.
कृषी संशोधन सेवेत करिअर करण्यासाठीही मार्गदर्शन
कृषी क्षेत्रात संशोधक आणि शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ICAR-NIASM, बारामती येथील वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विभागाचे कृषी वैज्ञानिक डॉ. पांडुरंग दिवटे यांनी कृषी संशोधन सेवा (ARS) परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले.
कृषी क्षेत्रातील संशोधनाच्या संधी आणि संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी याविषयी माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांसोबतच कृषी संशोधन क्षेत्रातील करिअरचे पर्याय समजून घेण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशा
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. राजेंद्र पवार, विश्वस्त तथा सचिव सौ. सुनंदा पवार, संस्था समन्वयक, मानव संसाधन अधिकारी तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली या सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ॲग्रीकल्चर कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या वतीने विविध शैक्षणिक, कौशल्यविकास आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून या विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेविषयीच्या शंकांचे निरसन करण्याची, स्पर्धा परीक्षांच्या तयारीची दिशा समजून घेण्याची आणि प्रशासकीय तसेच कृषी संशोधन क्षेत्रातील करिअरच्या संधी जाणून घेण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.






