स्थानिक

बारामतीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहरभाई शहा यांचे निधन

दिगंबर जैन समाजाचा आधारस्तंभ हरपला; विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी संस्थांमध्ये मोलाचे योगदान

बारामतीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहरभाई शहा यांचे निधन

दिगंबर जैन समाजाचा आधारस्तंभ हरपला; विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी संस्थांमध्ये मोलाचे योगदान

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील ज्येष्ठ श्रावक, दिगंबर जैन समाजाचे आधारस्तंभ आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी संस्थांमध्ये सक्रिय योगदान देणारे शेठ जवाहरभाई मोतीलाल शहा (वाघोलिकर) यांचे मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२६) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बारामतीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

शेठ जवाहरभाई शहा यांनी बारामतीच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष, बारामती नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष तसेच बारामती मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. विविध संस्थांमधील पदाधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

दिगंबर जैन समाजामध्ये त्यांना ज्येष्ठ श्रावक आणि मार्गदर्शक म्हणून मानाचे स्थान होते. समाजातील धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध क्षेत्रांतील संस्थांशी असलेला त्यांचा निकटचा संबंध आणि सामाजिक कार्यातील योगदान यामुळे त्यांनी बारामतीच्या सार्वजनिक जीवनात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच समाजबांधव, व्यापारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संस्थांशी संबंधित व्यक्तींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक व सार्वजनिक जीवनातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आज सायंकाळी अंत्ययात्रा

शेठ जवाहरभाई मोतीलाल शहा यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा आज, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता बारामती येथील त्यांच्या ‘धवलगिरी’, सिनेमा रोड येथील निवासस्थानापासून निघणार आहे. अंत्यविधी चांदशावली दर्ग्याजवळील अमरधाम येथे होणार आहेत.

शेठ जवाहरभाई मोतीलाल शहा यांच्या निधनाने बारामतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Back to top button