‘श्री सिद्धेश्वर राजा, शाहू चरणी तत्पर’! पुण्यात सापडलेल्या दोन शिक्क्यांतून उजळला बारामतीच्या इतिहासाचा मानबिंदू!
वाडा, जहागीर आणि मराठेशाहीचा वारसा

‘श्री सिद्धेश्वर राजा, शाहू चरणी तत्पर’! पुण्यात सापडलेल्या दोन शिक्क्यांतून उजळला बारामतीच्या इतिहासाचा मानबिंदू!
वाडा, जहागीर आणि मराठेशाहीचा वारसा
बारामती वार्तापत्र
मराठेशाहीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे बारामतीचे सरदार बाबूजी नाईक जोशी बारामतीकर यांचे दोन ऐतिहासिक शिक्के प्रथमच प्रकाशात आले आहेत. पुण्यातील पुरालेखागारात दख्खन इतिहास संशोधन संस्थेचे अभ्यासक निखिल भापकर यांना हे शिक्के आढळले. मु. सा. काकडे महाविद्यालयातील इतिहास अभ्यासक प्रा. दत्तात्रय जगताप यांनी या शिक्क्यांचे विश्लेषण केले असून, त्यातून बारामतीच्या ऐतिहासिक वैभवाची आणि मराठेशाहीतील राजकीय संबंधांची नवी माहिती समोर आली आहे.
या शिक्क्यांमधून सरदार बाबूजी नाईक यांची छत्रपती शाहू महाराजांप्रति असलेली निष्ठा आणि श्री सिद्धेश्वरावरील भक्तिभाव अधोरेखित होत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
‘श्री सिद्धेश्वर राजा, शाहू चरणी तत्पर’; शिक्क्यावरील मजकुरातून इतिहासाचे दर्शन
बाबूजी नाईक यांच्या नावाचा एक शिक्का बदामी आकाराचा असून, त्याची सुरुवात ‘श्री’काराने होते. त्यावर सहा ओळींमध्ये ‘श्री सिद्धेश्वर राजा शाहू चरणी तत्पर बाबूराव सदाशिव निरंतर’ असा मजकूर आहे. शिक्क्यात ‘श्री’च्या डाव्या बाजूला सूर्य, तर उजव्या बाजूला चंद्राची प्रतिमा आहे.
या मजकुरातून धार्मिक श्रद्धा, राजनिष्ठा आणि तत्कालीन राजकीय परंपरांचे दर्शन घडते. छत्रपती शाहू महाराज तसेच छत्रपती रामराजे यांनी दिलेल्या सरंजाम, मोकासे आणि इनामाच्या सनदांमध्येही बाबूजी नाईक यांचा उल्लेख ‘बाबूराव सदाशिव’ असा आढळतो.
विशेष म्हणजे, १७६० मधील एका पत्रावर या शिक्क्याचा वापर झाल्याची नोंद आहे. त्याच पत्रावर पत्रसमाप्तीसाठी वापरला जाणारा ‘लेखन सीमा’ हा शिक्काही आढळतो. त्यामुळे तत्कालीन प्रशासकीय आणि पत्रव्यवहाराच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी या ऐतिहासिक साधनांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
सावकारीपासून मराठेशाहीतील मुत्सद्देगिरीपर्यंतचा प्रवास
बाबूजी नाईक यांना त्यांचे वडील सदाशिव नाईक जोशी यांच्याकडून सावकारी व्यवसायाचा वारसा मिळाला. त्यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या लष्करी मोहिमांसाठी कर्जपुरवठा केला होता. पुढे मराठ्यांचे निजामाकडील वकील, सरंजामी मुत्सद्दी आणि राजकारणी म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पेशवेपद मिळविण्याचे प्रयत्न, नानासाहेब पेशव्यांशी झालेले मतभेद, कर्नाटक मोहिमेतील सहभाग आणि बारभाई कारस्थानातील भूमिका यांमुळे त्यांचा राजकीय प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. नव्याने समोर आलेले शिक्के त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि तत्कालीन राजकीय व्यवहारांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
बारामतीच्या वैभवशाली वारशाचे शिल्पकार
छत्रपती शाहू महाराजांकडून बारामती महालाची जहागीर मिळाल्यानंतर बाबूजी नाईक यांनी कऱ्हा नदीच्या पूर्वेस १७४३ मध्ये भव्य वाडा बांधला. त्यांनी नवी वस्ती आणि पेठा वसविल्या, श्री सिद्धेश्वर मंदिर बांधले तसेच प्रसिद्ध कवी मोरोपंत पराडकर यांना आश्रय दिला.
त्यांच्याकडे वार्षिक तीन लाख रुपयांच्या उत्पन्नाचा सरंजाम आणि पाच हजार स्वारांची फौज असल्याचे ऐतिहासिक नोंदींमध्ये नमूद असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कार्यामुळे बारामतीला राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत महत्त्व प्राप्त झाले.
वाड्यातील नियोजित संग्रहालयात शिक्के प्रदर्शित करण्याची मागणी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीतील सरदार बाबूजी नाईक यांच्या वाड्याचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण करण्यात आले आहे. या वाड्यात नियोजित संग्रहालय उभारले जात असताना, नव्याने प्रकाशात आलेल्या ऐतिहासिक शिक्क्यांच्या प्रतिमा तेथे प्रदर्शित कराव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.
मूळ ऐतिहासिक साधनांवर आधारित बाबूजी नाईक यांचा जीवनप्रवास, त्यांचे राजकीय योगदान आणि बारामतीच्या जडणघडणीतील भूमिका पर्यटक व इतिहासप्रेमींसमोर मांडण्यात यावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांना विनंती करण्यात येणार असल्याची माहिती दख्खन इतिहास संशोधन संस्थेचे अध्यक्ष मुकुंद पायगुडे, श्रीनिवास शिंदे, निखिल भापकर आणि प्रा. दत्तात्रय जगताप यांनी दिली.
या दोन शिक्क्यांच्या शोधामुळे बारामतीच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवजी वारसा पुन्हा चर्चेत आला असून, तो भावी पिढ्यांसाठी जतन आणि प्रदर्शित करण्याची संधी निर्माण झाली आहे.






