आपला जिल्हा

नवरात्रोत्सवात इंदापुरात महिलांचा गरबा-दांडिया रंगणार!

१४ ऑक्टोबरला भार्गवराम बगीच्यात महोत्सव; भरत शहा मित्र परिवाराचा पुढाकार, हिरकणी ग्रुपचा सहभाग

नवरात्रोत्सवात इंदापुरात महिलांचा गरबा-दांडिया रंगणार!

१४ ऑक्टोबरला भार्गवराम बगीच्यात महोत्सव; भरत शहा मित्र परिवाराचा पुढाकार, हिरकणी ग्रुपचा सहभाग

इंदापूर :

नवरात्रोत्सवाचा भक्तिमय माहोल, गरबा-दांडियाचा ठेका आणि स्त्रीशक्तीचा जागर… अशा उत्साहपूर्ण वातावरणात इंदापूर शहरातील महिलांना सांस्कृतिक आनंदाची पर्वणी अनुभवता येणार आहे. इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने (दि.१४) भार्गवराम बगीचा येथे गरबा-दांडिया महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातून महिलांना एकत्र येत नवरात्रोत्सवाचा आनंद लुटण्याची आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेचा उत्साहाने अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

नवरात्र हा आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीप्रती आदर व्यक्त करण्याचा मंगलमय काळ. या धार्मिक पर्वाला सांस्कृतिक आणि सामाजिक सहभागाची जोड देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा-दांडियाच्या तालावर फेर धरत आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच महिलांना दैनंदिन धावपळीतून विरंगुळा मिळावा, परस्परांतील संवाद वाढावा आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ व्हावेत, हा या उपक्रमामागील हेतू आहे.

भारतीय संस्कृतीतील पारंपरिक नृत्यप्रकार असलेल्या गरबा-दांडियाला नवरात्रोत्सवात विशेष महत्त्व आहे. भक्तिभाव, उत्साह आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम असलेल्या या उत्सवातून सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासोबतच सामाजिक सलोख्यालाही प्रोत्साहन मिळणार आहे. महिलांच्या सहभागातून नवरात्रोत्सवाचा आनंद अधिक खुलविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

हिरकणी ग्रुपचा आयोजनात सहभाग

या महोत्सवाच्या आयोजनात हिरकणी ग्रुपच्या वतीने हेमलता माळुंजकर, हर्षदा ढोले, स्वाती नागपुरे, अर्चना शिंदे, प्राजित परदेशी, शीतल कांबळे, सोनाली बोराटे, मनीषा घोडके, सपना वाघमारे आणि कृष्णा शिंगटे यांचा सहभाग आहे.

इंदापूर शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गरबा-दांडियाच्या तालावर आनंदोत्सवात सहभागी व्हावे आणि नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन नगराध्यक्ष भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button