आपला जिल्हा

गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींतून बालचिमुकल्यांनी जागविला शिवशौर्याचा इतिहास!

नवयुवक फाउंडेशनच्या गड-किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात; विजेत्यांना १५ हजार रुपयांची रोख पारितोषिके..

गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींतून बालचिमुकल्यांनी जागविला शिवशौर्याचा इतिहास!

नवयुवक फाउंडेशनच्या गड-किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात; विजेत्यांना १५ हजार रुपयांची रोख पारितोषिके..

इंदापूर,  –

छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नवयुवक फाउंडेशन, पोरापोरांची चावडी, इंदापूर शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गड-किल्ले स्पर्धा २०२६’ चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. बालचिमुकल्यांनी साकारलेल्या गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृतींमधून शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडले. या उपक्रमातून बालकांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळाले.

इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा आणि पंचायत समिती सदस्य श्रीराज भैय्या भरणे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक प्रणव राजेश परदेशी याने पटकावत सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले. द्वितीय क्रमांक देवयानी महेंद्र कांबळे हिने मिळवत पाच हजार रुपये, तर तृतीय क्रमांक रुद्राक्ष विकास ताटे याने मिळवत तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक बालस्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, बालदिनाचे औचित्य साधून सहभागी बालकांना भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

केवळ स्पर्धा आयोजित करणे एवढाच या उपक्रमाचा हेतू नसून, मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख निर्माण व्हावी, स्वराज्याच्या इतिहासाविषयी अभिमानाची भावना रुजावी आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे महत्त्व समजावे, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मुलांना इतिहासाशी जोडणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

यावेळी नगराध्यक्ष भरत शहा,माजी नगराध्यक्ष बाबू (नाना) गवळी, गटनेते शकील सय्यद, नगरसेवक प्रशांत उंबरे, अक्षय सूर्यवंशी, अनिल ढावरे, शुभम पवार, अजिंक्य जावीर,अमर नलवडे, स्वप्नील राऊत, अशोक मखरे (सर), सुभाष खरे, गणेश महाजन, रमेश शिंदे, प्रवीण हरणावळ, जावेद शिकलकर, स्वप्नील मखरे, प्रदीप रुपनवर, अजिंक्य ढाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. ॲड. श्रेयश सुरेश गवळी मित्र परिवार व नवयुवक फाउंडेशन, पोरापोरांची चावडी यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Back to top button