आपला जिल्हा

दिवाळीच्या फराळातून इंदापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गोडवा!

मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना फराळाची भेट; १२ नोव्हेंबरला ‘आशा के रंग’मधून अजरामर गीतांची सुरेल मेजवानी

दिवाळीच्या फराळातून इंदापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गोडवा!

मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना फराळाची भेट; १२ नोव्हेंबरला ‘आशा के रंग’मधून अजरामर गीतांची सुरेल मेजवानी

इंदापूर :

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीची देवाणघेवाण! याच सणाचा खरा अर्थ जपत इंदापूर शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा अनोखा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदू बांधवांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमातून धार्मिक सलोखा, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची नवी ज्योत प्रज्वलित होणार आहे.

दिवाळीच्या सणात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत सणाचा आनंद साजरा करावा आणि परस्परांमधील प्रेमाचे नाते अधिक घट्ट व्हावे, या उदात्त भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धर्माच्या सीमा ओलांडून माणुसकीचा गोडवा जपणाऱ्या या आयोजनामुळे इंदापूरच्या सामाजिक ऐक्याला एक वेगळे अधिष्ठान मिळणार आहे.

या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे, ज्येष्ठ गायिका स्वर्गीय आशा भोसले यांच्या अजरामर गीतांची सुरेल मैफल! गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता नगरपालिका परिसरातील प्राथमिक मुलींची शाळा क्रमांक १ व २ येथे ‘आशा के रंग’ हा विशेष संगीत कार्यक्रम रंगणार आहे. सुप्रसिद्ध गायक श्री. जितेंद्र भुरुक यांच्या प्रस्तुतीतून आशा भोसले यांच्या लोकप्रिय गीतांचा स्वरमय नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.

 

फराळाच्या गोडव्याबरोबरच संगीताची मेजवानी आणि सर्वधर्मीयांच्या एकत्र येण्याचा आनंद अशा दुहेरी पर्वणीने हा सोहळा सजणार आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ दिवाळी फराळापुरता मर्यादित नसून हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा, प्रेम, आपुलकी आणि परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

या अनोख्या दीपोत्सवात इंदापूर शहरातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती आणि सर्व संगीतप्रेमींनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवे घराघरांत उजळतील; पण माणुसकीचा दिवा मनामनांत तेव्हाच उजळेल, जेव्हा सणांचा आनंद एकमेकांसोबत वाटला जाईल. इंदापुरातील हा उपक्रम याच सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देणारा ठरणार आहे.

Back to top button