उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नांतून पशुपालकांना मोठा दिलासा! निबोडीत शेतकऱ्यांना मोफत सुधारित चारा बियाण्यांचे वाटप; दुष्काळात पशुधनासाठी आधार!
दुष्काळाच्या झळा पशुधनाला बसू नयेत म्हणून पुढाकार!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नांतून पशुपालकांना मोठा दिलासा! निबोडीत शेतकऱ्यांना मोफत सुधारित चारा बियाण्यांचे वाटप; दुष्काळात पशुधनासाठी आधार!
दुष्काळाच्या झळा पशुधनाला बसू नयेत म्हणून पुढाकार!
बारामती वार्तापत्र
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या चारा टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी बारामती पंचायत समितीच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तालुक्यातील पशुधनाला वर्षभर पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा आणि पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने निबोडी येथे शेतकऱ्यांना मोफत सुधारित चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत बारामती तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना, निबोडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन सुधारित चारा बियाण्यांचे मोफत वितरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी आगवणे, निबोडीचे सरपंच संतोष सोनवणे, माजी उपसरपंच भालेराव जाचक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राम गोटमाळे यांनी शेतकऱ्यांना चारा बियाण्यांची योग्य पद्धतीने लागवड, चारा उत्पादनाचे नियोजन, जनावरांसाठी पौष्टिक चाऱ्याचे महत्त्व आणि मुरघास निर्मिती याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.
केवळ बियाण्यांचे वाटप न करता शेतकऱ्यांनी उपलब्ध जमिनीमध्ये चारा पिकांची लागवड करून स्वतःच्या पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले. मुरघास निर्मितीच्या माध्यमातून अतिरिक्त हिरवा चारा साठवून ठेवता येतो. त्यामुळे चारा उपलब्ध नसलेल्या काळातही जनावरांना पौष्टिक आहार देणे शक्य होते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे बारामती तालुक्यात चारा उत्पादनाला प्रोत्साहन मिळणार असून, पशुधनाचे आरोग्य टिकविण्यासाठी मदत होणार आहे. दुष्काळाच्या काळात पशुपालक शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागू नये आणि जनावरांचे संगोपन आर्थिकदृष्ट्या सुलभ व्हावे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
दुष्काळाच्या संकटात केवळ शेतीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या पशुधनाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मोफत सुधारित चारा बियाण्यांचे वाटप आणि तांत्रिक मार्गदर्शन यामुळे बारामती तालुक्यातील पशुपालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






