मिठाईऐवजी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट! प्रसाद खरतुडे यांचा माणुसकीचा अनोखा उपक्रम; बारामतीकरांकडून कौतुकाचा वर्षाव!
मिठाईच्या पुड्यांपेक्षा कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद

मिठाईऐवजी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट! प्रसाद खरतुडे यांचा माणुसकीचा अनोखा उपक्रम; बारामतीकरांकडून कौतुकाचा वर्षाव!
मिठाईच्या पुड्यांपेक्षा कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद
बारामती वार्तापत्र
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि भेटवस्तूंचा सण! मात्र, यंदा बारामतीत प्रभाग क्रमांक ७ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रसाद भगवानराव खरतुडे यांनी दिवाळी साजरी करण्याची एक अनोखी पद्धत निवडत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. मिठाई वाटप किंवा स्वतः दिवाळीचा उत्सव साजरा करण्याऐवजी त्यांनी बारामती नगरपरिषदेच्या सफाई महिला कामगार आणि पुरुष कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
बारामती नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विषय काही दिवसांपासून चर्चेत होता. ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा सुरू असतानाच या कर्मचाऱ्यांसाठी आपणही काहीतरी योगदान द्यावे, या भावनेतून प्रसाद खरतुडे यांनी हा उपक्रम राबवला.
या उपक्रमांतर्गत तब्बल ४० महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्या, तर ११ पुरुष कर्मचाऱ्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. एकूण ५१ कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देत त्यांनी सामाजिक जाणीव आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न उपस्थितांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी झटणाऱ्या हातांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला बारामती नगरपरिषदेचे अध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक अमर धुमाळ, दि बारामती सहकारी बँकेचे चेअरमन शिरीष कुलकर्णी, माणिक आबा मोकाशी, अमित लोणकर, जय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मिठाईच्या पुड्यांपेक्षा कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा, ही भावना कृतीतून दाखवून देणाऱ्या प्रसाद खरतुडे यांच्या या उपक्रमाचे बारामती शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.






