स्थानिक

“संघर्षाला सलाम, कर्तृत्वाचा सन्मान! दिवाळीच्या मुहूर्तावर बारामतीत कर्तृत्ववान महिलांना ‘जिजाऊ नारी पुरस्कार’!”

कधी संसाराचा आधार, तर कधी यशस्वी उद्योजिका!

“संघर्षाला सलाम, कर्तृत्वाचा सन्मान! दिवाळीच्या मुहूर्तावर बारामतीत कर्तृत्ववान महिलांना ‘जिजाऊ नारी पुरस्कार’!”

कधी संसाराचा आधार, तर कधी यशस्वी उद्योजिका!

बारामती वार्तापत्र 

दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधत बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने बारामती शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘जिजाऊ नारी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. महिलांच्या संघर्षाचा, जिद्दीचा, चिकाटीचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सहकार, औद्योगिक आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काही महिलांनी मुलांना घडवले, काहींनी पतीच्या व्यवसायाला खंबीर साथ देत यश मिळवले, तर काहींनी अपंगत्वावर मात करून आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर नोकरी व व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अशा प्रेरणादायी महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बारामती नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, वाल्हेकर ज्वेलर्सच्या संचालिका सारिका चेतन शहा वाल्हेकर, निमिष चेतन शहा, उपनगराध्यक्ष, नगरसेविका, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे बचत गट संचालक महेश हराळ, पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच विविध बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमात वनिता बनकर, सुनीता शहा, सविता जाधव, श्वेता नाळे, योगिनी मुळे, अर्चना सातव आणि वृषाली निकम यांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले. त्यांच्या संघर्षमय प्रवासातून उपस्थित महिलांना प्रेरणा मिळाली.

यावेळी जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण म्हणाल्या की, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे. महिलांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक अडचणींवर मात करत यश मिळवले आहे. अशा महिलांचा सन्मान म्हणजे त्यांच्या संघर्षाला दिलेली पोचपावती आहे.

वाल्हेकर ज्वेलर्सच्या संचालिका सारिका चेतन शहा वाल्हेकर यांनीही महिलांच्या कार्याचे कौतुक केले. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. अशा सन्मानामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा शिंदे, सुनंदा जगताप, संगीता साळुंखे, कल्पना माने, मनीषा खेडेकर, ऋतुजा नलवडे, गौरी पाटील, पूजा खलाटे, वीणा यादव, सुवर्णा केसकर, वंदना जाधव, अमृता सूर्यवंशी, छाया पाटील, ऐश्वर्या बागल आदी जिजाऊ सेवा संघाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळे पाटील यांनी केले, तर आभार मनीषा शिंदे यांनी मानले.

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या संघर्षाला सन्मान देणारा ‘जिजाऊ नारी पुरस्कार’ सोहळा बारामतीत प्रेरणादायी ठरला.

Back to top button