बारामतीच्या मुर्टीत घरफोडीचा थरार! पाच जणांचा सहभाग उघड; एकाला बेड्या, चौघांचा शोध!
वॉशिंग मशीन पोलिसांनी पंचनामा करून जप्त

बारामतीच्या मुर्टीत घरफोडीचा थरार! पाच जणांचा सहभाग उघड; एकाला बेड्या, चौघांचा शोध!
वॉशिंग मशीन पोलिसांनी पंचनामा करून जप्त
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील मुर्टी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपास करून उलगडा केला आहे. या प्रकरणी सिद्धार्थ सोमनाथ सोनवणे (वय २४, रा. नावळी, ता. पुरंदर) याला अटक करण्यात आली असून, चोरीला गेलेली पॅनासॉनिक कंपनीची वॉशिंग मशीन पोलिसांनी पंचनामा करून जप्त केली आहे.
मुर्टी येथील घरफोडीप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. त्यानुसार नावळी येथील सिद्धार्थ सोमनाथ सोनवणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अन्य चार साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे.
आरोपीकडून चोरीला गेलेली पॅनासॉनिक कंपनीची वॉशिंग मशीन जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य चार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू असून, त्यांना अटक करण्यासाठी तपास पथक प्रयत्नशील आहे. तसेच आरोपींकडे अधिक तपास केल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सादिक इनामदार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक राहुल सावळे यांच्यासह वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.






