बारामतीत दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट संपवला! पोलिसांचा दणका; १० मोटारसायकली जप्त
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध

बारामतीत दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट संपवला! पोलिसांचा दणका; १० मोटारसायकली जप्त!
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध
बारामती वार्तापत्र
बारामती शहरासह एम.आय.डी.सी. परिसरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोटारसायकल चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी एकूण १० चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या असून, सुमारे ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबानगर, बारामती येथील पियुष मनोजकुमार तुशबंड यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यांची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक MH-42-BQ-0644) तसेच मोटारसायकलच्या सीटमध्ये ठेवलेले विवो कंपनीचे दोन मोबाईल फोन चोरीला गेले होते.
२६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० ते २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान डायनामिक्स डेअरीसमोरून ही चोरी झाली होती. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. या चोरीमध्ये इमरान फिरोज शेख (वय २९, रा. यशवंतनगर, अकलूज) आणि श्री उर्फ श्रीराज नवनाथ वाघंबरे (वय २९, रा. विझोरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अकलूज येथे दोन पथके तयार करून सापळा रचला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.
अकलूजमधून आणखी तीन दुचाकी जप्त
अटक केलेल्या आरोपींकडे अधिक तपास केला असता, त्यांनी बारामती येथून आणखी तीन मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकलूज येथून या मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे बारामती तालुका पोलीस ठाण्यातील आणखी तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
या प्रकरणात एकूण चार मोटारसायकली आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दुचाकी चोरीच्या सहा गुन्ह्यांचा उलगडा
तपासादरम्यान बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी सहा दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गणेश शिवा काळे (वय २९, रा. मोरेवस्ती, वरकुटे खुर्द, ता. इंदापूर) आणि प्रज्वल प्रतापराव मुंडफुणे पाटील (वय २४, रा. महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर; सध्या रा. निमगाव केतकी परिसर) यांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या आरोपींकडून सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये आहे.
अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १० मोटारसायकली आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
बारामती परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.
बारामती तालुका पोलिसांचा दुचाकी चोरट्यांविरोधातील तपास आणि कारवाई सुरूच आहे.






