बारामतीत इंजेक्शनच्या ११० बाटल्यांचा साठा जप्त! इंदापूर रोडवर पोलिसांचा छापा; चार जण दोन मोटारसायकलींसह ताब्यात
MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP चा अनधिकृत विक्रीसाठी साठा असल्याचा संशय; पुरवठा साखळीचा शोध सुरू

बारामतीत इंजेक्शनच्या ११० बाटल्यांचा साठा जप्त! इंदापूर रोडवर पोलिसांचा छापा; चार जण दोन मोटारसायकलींसह ताब्यात
MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP चा अनधिकृत विक्रीसाठी साठा असल्याचा संशय; पुरवठा साखळीचा शोध सुरू
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात औषधी इंजेक्शनच्या संशयास्पद साठ्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील मार्केट यार्डलगत इंदापूर रोड परिसरात बारामती शहर पोलिसांनी छापा टाकून MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या इंजेक्शनच्या ११० बाटल्या जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या इंजेक्शनचा अनधिकृत विक्रीसाठी साठा बाळगल्याच्या संशयावरून पोलिसांनी चार जणांना दोन मोटारसायकलींसह ताब्यात घेतले आहे.
रविवारी (ता. ८) गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत तपासणी केली. यावेळी इंजेक्शनच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
११० बाटल्या कुठून आल्या? विक्रीचे जाळे किती मोठे?
एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शनच्या बाटल्या नेमक्या कुठून आणण्यात आल्या? त्यांचा पुरवठा कोण करत होते? या इंजेक्शनची विक्री कोणाला केली जाणार होती? तसेच या व्यवहारामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे? असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाले आहेत.
पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असले, तरी त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि या साठ्याचा मुख्य पुरवठादार कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. केवळ साठा जप्त करण्यापुरती कारवाई न राहता या इंजेक्शनच्या खरेदी-विक्रीची संपूर्ण साखळी उघड होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गांजा प्रकरणानंतर आता इंजेक्शनचा साठा; बारामतीकरांमध्ये चर्चा!
बारामती परिसरात यापूर्वी गांजाचा मोठा साठा जप्त झाल्याची घटना चर्चेत आली होती. आता इंजेक्शनच्या ११० बाटल्यांचा साठा आढळल्याने शहरातील संशयास्पद औषधविक्री आणि पुरवठा साखळीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि पुरवठा साखळीबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत असतानाच या नव्या कारवाईत तरी पोलिस तपासातून संपूर्ण जाळे समोर येणार का, असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणात कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा किंवा राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे अफवांपेक्षा तपासातून समोर येणाऱ्या अधिकृत माहितीला महत्त्व आहे.
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. चार जणांना दोन मोटारसायकलींसह ताब्यात घेण्यात आले असून, इंजेक्शनचा साठा कुठून आला, त्याचा पुरवठा कोण करत होते आणि या प्रकरणात आणखी कोणाचे धागेदोरे आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
११० इंजेक्शनच्या बाटल्या, चार जण ताब्यात आणि दोन मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात; मात्र या साठ्यामागील मुख्य पुरवठादार कोण? बारामती पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.






