आपला जिल्हा

निमगाव केतकीतील शेळी-मेंढी बाजार स्थलांतरित करा; शेतकरी, पशुपालकांची मागणी

अपुऱ्या जागेमुळे वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेचा प्रश्न; बाजार बंद न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हलविण्याची निवेदनाद्वारे मागणी

निमगाव केतकीतील शेळी-मेंढी बाजार स्थलांतरित करा; शेतकरी, पशुपालकांची मागणी

अपुऱ्या जागेमुळे वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेचा प्रश्न; बाजार बंद न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हलविण्याची निवेदनाद्वारे मागणी

इंदापूर, –

निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सुरू असलेला शेळी-मेंढी बाजार सध्याच्या अपुऱ्या जागेत भरत असल्याने शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हा बाजार बंद न करता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशस्त आवारात स्थलांतरित करावा, अशी मागणी निमगाव केतकी परिसरातील शेतकरी, पशुपालक व व्यापारी बांधवांनी केली आहे.

यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. सध्या बाजार भरत असलेल्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने बाजारासाठी येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहने लावण्याचा प्रश्न निर्माण होत असून, बाजारातील गर्दीमुळे सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेळी-मेंढी बाजार हा शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने तो बंद करण्याऐवजी अधिक प्रशस्त आणि सुविधायुक्त ठिकाणी सुरू ठेवणे आवश्यक आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजारासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून दिल्यास पार्किंगसह आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करणे शक्य होईल. त्यामुळे सर्व घटकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बाजार स्थलांतराबाबत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने निर्णय घ्यावा, बाजारासाठी स्वतंत्र जागा, पार्किंग व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ‘बाजार बंद नको, जागा बदला! अपुऱ्या जागेचा प्रश्न सोडवा; शेळी-मेंढी बाजार मार्केट कमिटीत हलवा!’ अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी या मागणीची दखल घेऊन काय निर्णय घेतात, याकडे निमगाव केतकी परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Back to top button