कर्मयोगी कारखान्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील; उपाध्यक्षपदी छगन भोंगळे बिनविरोध
सलग चौथ्यांदा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा; शेतकरी-कर्मचारी केंद्रस्थानी ठेवून कामकाज करण्याचा निर्धार

कर्मयोगी कारखान्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील; उपाध्यक्षपदी छगन भोंगळे बिनविरोध
सलग चौथ्यांदा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा; शेतकरी-कर्मचारी केंद्रस्थानी ठेवून कामकाज करण्याचा निर्धार
इंदापूर, –
महात्मा फुलेनगर-बिजवडी (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी छगन भोंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवारी (दि. १२) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
कारखान्याची सन २०२६ ते २०३१ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. कारखान्याची सलग दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याची ही घटना ठरली. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी छगन भोंगळे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष छगन भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कर्मयोगी कारखान्याचे कामकाज सध्या कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना आणि ओंकार शुगर अँड डिस्टिलरी यांच्या सहयोगातून सुरू आहे. शासनाच्या मान्यतेने झालेल्या या सहयोगी कराराला एक वर्ष पूर्ण झाले असून, दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली आहे. चालू सन २०२६-२७ चा गळीत हंगाम शुक्रवारपासून सायंकाळी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

गत गळीत हंगामासाठी कारखान्याने प्रतिटन ३ हजार ३५० रुपये दर जाहीर केला असून, त्यातील उर्वरित प्रतिटन १५० रुपयांची रक्कम येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि कर्मचारी हेच कारखान्याच्या कामकाजाचे केंद्रबिंदू असतील. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने कारखान्याचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कर्मयोगी कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, डॉ. यशवंत माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, हनुमंतराव कोकाटे, अविनाश घोलप, तेजसिंह पाटील, अशोक घोगरे, डी. एन. जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेते, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, शेतकरी संघटना, कार्यकर्ते आणि सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले.

यावेळी संचालक राजवर्धन पाटील, वसंत मोहोळकर, पराग जाधव, शांतीलाल शिंदे, रविंद्र सरडे, राकेश शुक्ला, निलेश देवकर, राजेंद्रकुमार देवकर, संतोष काळे, श्रीकांत देवकर, विजय खर्चे, रणजित निकम, रोहित गायकवाड, बिभिषण नलवडे, अतुल शिंगाडे, हरिश्चंद्र पारेकर, अमोल जाधव, रत्नमाला पवार, सुमन व्यवहारे उपस्थित होते.
नूतन संचालक मंडळाचा ओमराजे बोत्रे-पाटील, लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, अॅड. कृष्णाजी यादव, जयकुमार कारंडे, गोविंद रणवरे, अॅड. मनोहर चौधरी, पिंटू काळे, उत्तम जाधव, विक्रांत कोरटकर, मनोज मोरे, अशोक शिंदे, आबासाहेब शिंगाडे, सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, किरण पाटील, महादेव शेंडगे, अंकुश पाडुळे, कार्यकारी संचालक विजय शिर्के व जनरल मॅनेजर रणजित तावरे यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले.






