बारामतीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये! सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची घेतली बैठक!
दुष्काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा!

बारामतीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये! सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची घेतली बैठक!
दुष्काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा!
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये आणि नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले आहे. सहयोग निवासस्थान, बारामती येथे बारामती नगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शहरात सध्या सुरू असलेली विकासकामे, प्रलंबित कामे तसेच प्रस्तावित प्रकल्पांची सविस्तर माहिती घेण्यात आली. विकासकामांची सद्यस्थिती, कामांमधील अडचणी आणि पुढील नियोजन यांचा आढावा घेत शहराच्या विकासाला गती देण्यावर भर देण्यात आला.
मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा विशेष चर्चेत राहिला. बारामतीकरांना नियमित आणि सुरळीत पाणी मिळावे, पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर व्हावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना संभाव्य टंचाईचा विचार करून आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
बारामती शहराचा नियोजनबद्ध विकास करताना रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित कामांना योग्य गती मिळणे आवश्यक आहे. यासाठी नगरपालिका आणि संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय राखून जबाबदारीने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
एकीकडे दुष्काळाचे संकट आणि दुसरीकडे शहराच्या विकासाची जबाबदारी, अशा दुहेरी आव्हानाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या अंमलबजावणीकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे. बैठकीतील सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.






