‘माझा आनंद हरवला’ गीताने वातावरण भावूक! अजितदादांच्या आठवणींत बारामतीकर गहिवरले; दहा हजार पणत्यांतून अनोखी श्रद्धांजली!
‘दादा, तुम्ही नसाल सोबत, पण तुमच्या आठवणींचा प्रकाश कधीच विझणार नाही!’ हजारो पणत्या, मोबाईल टॉर्च आणि भावस्पर्शी गीतांतून दिवंगत अजितदादांना बारामतीकरांची अनोखी आदरांजली!

‘माझा आनंद हरवला’ गीताने वातावरण भावूक! अजितदादांच्या आठवणींत बारामतीकर गहिवरले; दहा हजार पणत्यांतून अनोखी श्रद्धांजली!
‘दादा, तुम्ही नसाल सोबत, पण तुमच्या आठवणींचा प्रकाश कधीच विझणार नाही!’ हजारो पणत्या, मोबाईल टॉर्च आणि भावस्पर्शी गीतांतून दिवंगत अजितदादांना बारामतीकरांची अनोखी आदरांजली!
बारामती वार्तापत्र
एखादी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली तरी तिच्या कार्याचा ठसा आणि माणसांच्या मनात निर्माण केलेले स्थान कधीही पुसले जात नाही. याच भावनेचा हृदयस्पर्शी अनुभव बारामतीतील सनसेट पॉईंटवर पाहायला मिळाला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘एक पणती दादांसाठी… असंख्य आठवणी त्यांच्या कार्यासाठी…’ या विशेष उपक्रमात दहा हजारांहून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. या दीपोत्सवाने संपूर्ण सनसेट पॉईंट उजळून निघाला, तर हजारो बारामतीकरांच्या डोळ्यांत दादांच्या आठवणींनी अश्रू तरळले.
या भावपूर्ण कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, युवा नेते जयदादा पवार, अजितदादांच्या भगिनी विजया पाटील, ऋतुजा जय पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पहिला दिवाळी पाडवा दादांशिवाय; आठवणींना उजाळा
गेली अनेक वर्षे दिवाळी पाडव्याच्या दिवशी अजितदादा बारामतीकरांच्या भेटीसाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असायचे. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेणे, नागरिकांना वेळ देणे आणि बारामतीच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणे ही त्यांची खास कार्यशैली होती.
मात्र, यंदाचा दिवाळी पाडवा अजितदादांशिवाय साजरा होत असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या विशेष दीपवंदना उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दादांच्या आठवणींना उजाळा देताना नागरिकांनी आपल्या भावना पणत्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
अजितदादांची भव्य रांगोळी ठरली आकर्षणाचे केंद्र
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे अजितदादांचे साकारण्यात आलेले भव्य आणि आकर्षक रांगोळीचित्र. महेंद्र दीक्षित सर, भारत काळे सर, सिद्धार्थ कांबळे सर आणि वेदांत काळे यांनी आपल्या कलाकौशल्यातून अजितदादांचे सुंदर रांगोळीचित्र साकारले. या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी या रांगोळीसमोर थांबून दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
विद्युत रोषणाई बंद; हजारो पणत्यांनी उजळला परिसर
या कार्यक्रमातील सर्वांत भावस्पर्शी क्षण म्हणजे परिसरातील विद्युत रोषणाई बंद करून केवळ पणत्यांच्या प्रकाशात अजितदादांना अभिवादन करण्यात आले. दहा हजारांहून अधिक पणत्यांच्या प्रकाशाने सनसेट पॉईंट उजळून निघाला. उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलची टॉर्च सुरू करून या श्रद्धांजली उपक्रमात सहभाग घेतला.
हजारो पणत्यांचा प्रकाश आणि मोबाईल टॉर्चच्या लखलखाटाने संपूर्ण परिसर भावपूर्ण वातावरणाने भारावून गेला. हा अनोखा क्षण उपस्थितांच्या मनावर कायमचा कोरला गेला.
‘माझा आनंद हरवला’ गीताने अनेकांचे डोळे पाणावले
कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या ‘माझा आनंद हरवला’ या भावस्पर्शी गीताने उपस्थितांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजितदादांसोबतच्या आठवणी, त्यांचा सहवास, त्यांची कार्यशैली आणि बारामतीच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आठवताना अनेक नागरिक भावूक झाले. गीताच्या सुरांनी संपूर्ण परिसरात हळवे वातावरण निर्माण झाले.
हा केवळ दीपोत्सव नव्हे, तर दादांवरील प्रेमाची साक्ष!
या उपक्रमात नागरिकांनी कोणताही औपचारिकपणा न ठेवता स्वतःहून पणत्या आणून सहभाग नोंदवला. दहा हजारांहून अधिक पणत्या, हजारो मोबाईल टॉर्च, अजितदादांचे भव्य रांगोळीचित्र आणि उपस्थितांच्या मनात दाटलेल्या असंख्य आठवणी… या सगळ्यांतून बारामतीकरांचे अजितदादांवरील प्रेम पुन्हा एकदा व्यक्त झाले.
अजितदादा आज प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांनी बारामतीच्या विकासासाठी दिलेले योगदान, कामाचा वेग, सर्वसामान्यांशी जोडलेले नाते आणि नागरिकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास त्यांच्या आठवणींमधून कायम जिवंत राहणार आहे.
सनसेट पॉईंटवर प्रज्वलित झालेल्या हजारो पणत्यांनी जणू एकच भावनिक संदेश दिला…
‘दादा, तुम्ही नसाल सोबत, पण तुमच्या आठवणींचा प्रकाश कधीच विझणार नाही!’






