‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही?’ तटकरेंनी विलीनीकरणावर सस्पेन्स वाढवला; निर्णय सुनेत्रा पवार-शरद पवार घेणार!
‘दादांशिवाय दिवाळी पाडवा मनाला कधीच पटू शकत नाही.

‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही?’ तटकरेंनी विलीनीकरणावर सस्पेन्स वाढवला; निर्णय सुनेत्रा पवार-शरद पवार घेणार!
‘दादांशिवाय दिवाळी पाडवा मनाला कधीच पटू शकत नाही.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांचा भावनांचा बांध फुटला. गेल्या ३० वर्षांपासून दिवाळी पाडव्याला बारामतीत येण्याची परंपरा आजही कायम आहे; मात्र यंदा अजितदादांशिवाय पाडवा साजरा करण्याची वेळ आल्याने मनाला प्रचंड वेदना होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘दादांशिवाय दिवाळी पाडवा मनाला कधीच पटू शकत नाही. केवळ त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मी आज बारामतीत आलो आहे,’ असे सांगताना तटकरे भावूक झाले. नियतीपुढे कोणाचेही चालत नाही, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली.
विलीनीकरणाचा चेंडू सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कोर्टात!
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. आजचा दिवस राजकीय चर्चेसाठी योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. विलीनीकरणासंदर्भात काही निर्णय घ्यायचा असल्यास राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हेच योग्य वेळी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या असा कोणताही मुद्दा आपल्या समोर नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थखात्यावरून तटकरेंचा ठाम इशारा; ‘हक्क सोडणार नाही!’
एकीकडे अजितदादांच्या आठवणीने भावूक झालेल्या तटकरे यांनी दुसरीकडे राज्यातील सत्तावाटपाच्या राजकारणावर मात्र स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात अजित पवारांचे मोठे योगदान असून त्यांनी विक्रमी अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारमध्ये अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाले पाहिजे, ही आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०१० मध्ये महाराष्ट्राचा ५० वा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी आपल्याला शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे मिळाली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
भावनेतून श्रद्धांजली, राजकारणात मात्र ठाम भूमिका!
बारामतीतील दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले. मात्र विलीनीकरणाच्या प्रश्नावर निर्णयाचे अधिकार सुनेत्रा पवार आणि शरद पवारांकडे सोपवताना अर्थखात्याच्या मुद्द्यावर पक्षाचा दावा ठामपणे मांडला. त्यामुळे तटकरेंच्या बारामती दौऱ्यात भावनिक श्रद्धांजलीसोबतच आगामी राजकीय समीकरणांचे संकेतही पाहायला मिळाले.






