“तथाकथित सूत्रांवर राष्ट्रवादीचा निशाणा; छुप्या राजकीय अजेंड्यासाठी माध्यमांचा वापर होत असल्याचा आरोप!”
‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!’

“तथाकथित सूत्रांवर राष्ट्रवादीचा निशाणा; छुप्या राजकीय अजेंड्यासाठी माध्यमांचा वापर होत असल्याचा आरोप!”
‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!’
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत गेल्या आठवडाभरापासून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. विलीनीकरणासंदर्भात कोणतीही औपचारिक किंवा अनौपचारिक चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट करत, तथाकथित सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसारित करणाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच स्वतःचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी काही मंडळी माध्यमांचा वापर करत आहेत का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
आदरणीय सुनेत्रावहिनी पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्या पुण्यात असताना पक्षाचे आमदार, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेणे स्वाभाविक असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदारसंघातील विकासकामे, जिल्हा नियोजन समितीचे विषय तसेच मंत्रालयात प्रलंबित असलेल्या कामांसंदर्भात आमदारांनी आपल्या नेतृत्वाची भेट घेणे ही नियमित राजकीय प्रक्रिया आहे. मात्र, अशा भेटींनाही वेगळा राजकीय रंग देत ‘पार्थ पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली’ अशा बातम्या प्रसारित केल्या जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून तथाकथित सूत्रांच्या हवाल्याने विविध बातम्या प्रसारित होत होत्या. मात्र, विलीनीकरणासंदर्भात ना आमच्या बाजूने, ना त्यांच्या बाजूने कोणतीही चर्चा सुरू असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि यासंदर्भात चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
मग गेल्या आठवडाभरापासून विलीनीकरणाच्या बातम्या माध्यमांपर्यंत नेमक्या कोणी पोहोचवल्या, असा सवाल उपस्थित करत काही मंडळी स्वतःचे राजकीय हितसंबंध आणि छुपा अजेंडा साधण्यासाठी माध्यमांचा वापर करत आहेत का, याचा शोध माध्यमांनीच घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातील कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते किंवा प्रमुख नेत्यांकडून वस्तुस्थितीची खातरजमा करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
माध्यमांची विश्वासार्हता हीच पत्रकारितेची खरी ताकद असून ती कोणाच्याही छुप्या राजकीय अजेंड्यासाठी पणाला लागू नये, असे स्पष्ट करत ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!’ या शब्दांत पक्षाकडून आपली भूमिका मांडण्यात आली आहे.






