आपला जिल्हा

इंदापुरात मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना दिवाळी फराळाची भेट!

प्रदीप गारटकर यांच्या सहकार्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गोडवा; माणुसकीच्या उपक्रमाने इंदापूरकरांची जिंकली मने

इंदापुरात मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना दिवाळी फराळाची भेट!

प्रदीप गारटकर यांच्या सहकार्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गोडवा; माणुसकीच्या उपक्रमाने इंदापूरकरांची जिंकली मने

इंदापूर :

सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे निमित्त नसते, तर माणसांना माणसांशी जोडणारा आणि सामाजिक नात्यांमधील आपुलकी अधिक दृढ करणारा दुवा असतो. याच भावनेचा प्रत्यय इंदापूर शहरात दिवाळीनिमित्त आला. मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करून हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा गोड संदेश दिला. लोकनेते प्रदीप दादा गारटकर यांच्या मोलाच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे.

इंदापूर नगरपालिका मैदान तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार यशवंत माने, माजी सभापती प्रवीण माने, नगराध्यक्ष भरत शहा, सचिव मुकुंद शहा यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी उत्साहाने हिंदू बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप केले. सण कोणत्याही धर्माचा असो, त्यातील आनंद सर्वांनी एकत्रितपणे साजरा करावा, ही भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.

**प्रदीप गारटकर यांच्या सहकार्याबद्दल विशेष सन्मान**

या सामाजिक उपक्रमाला लोकनेते प्रदीप दादा गारटकर यांनी मोलाचे सहकार्य केले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या त्यांच्या सहकार्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तशुभाई सय्यद आणि फरजाना मुजावर यांनी मनोगत व्यक्त करत हिंदू-मुस्लिम ऐक्य, परस्पर विश्वास आणि सामाजिक एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले.

**फराळाच्या गोडव्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश**

दिवाळीच्या फराळाचे वाटप हा केवळ एक कार्यक्रम न राहता दोन समाजांमधील प्रेम, विश्वास आणि आपुलकी व्यक्त करणारा उपक्रम ठरला. धर्माच्या भिंतींपेक्षा माणुसकीचे नाते मोठे असते, हे या कृतीतून अधोरेखित झाले. सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील अंतर कमी करून एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याची इंदापूरची सामाजिक परंपरा या उपक्रमामुळे पुन्हा एकदा दिसून आली.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरसेवक गणेश राऊत, सुधाकर ढगे, अनिल पवार, अक्षय गानबोटे, वसीम बागवान, मुनीर बागवान, नगरसेविका शितल शेटे, सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख, रोहित बंडा पाटील, अक्षय शिंदे, रुपेश सोनी, गोरख पवार, सोनू सय्यद आदींनी परिश्रम घेतले.

**धर्म वेगळे, पण माणुसकीचा गोडवा एकच!**

दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने इंदापुरात अनुभवायला मिळालेला हा सामाजिक ऐक्याचा सोहळा केवळ सणापुरता मर्यादित न राहता समाजाला एकत्र आणणारा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

Back to top button