क्राईम रिपोर्ट

अविष्कार ढोलेच्या मृत्यूचे गूढ कायम! स्वतःवर गोळी झाडली की कुणी मारली? बारामतीत चर्चांना उधाण

प्रकार आत्महत्येचा होता की अन्य काही घडले? पिस्तुल आले कुठून?

अविष्कार ढोलेच्या मृत्यूचे गूढ कायम! स्वतःवर गोळी झाडली की कुणी मारली? बारामतीत चर्चांना उधाण

प्रकार आत्महत्येचा होता की अन्य काही घडले? पिस्तुल आले कुठून?

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात १९ वर्षीय तरुणाच्या डोक्यात गोळी लागून झालेल्या घटनेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या तणावामुळे त्याने स्वतःवर गोळी झाडल्याची प्राथमिक चर्चा असली, तरी गोळीबाराची नेमकी परिस्थिती अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे हा प्रकार आत्महत्येचा होता की या घटनेमागे अन्य व्यक्तीचा सहभाग आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मृत तरुणाचे नाव अविष्कार अमोल ढोले (वय १९, रा. कुरवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आहे. तो बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंट येथे राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अविष्कारच्या डोक्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद बारामती तालुका पोलीस ठाण्यात मयत रजिस्टर क्रमांक ८५/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

पिस्तुल आले कुठून?

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अविष्कारकडे पिस्तुल आले कुठून? त्याच्याकडे हे शस्त्र कोणी आणून दिले? ते त्याचे स्वतःचे होते की अन्य कोणाकडून मिळाले? गोळीबाराच्या वेळी त्याच्यासोबत कोण होते? घटनास्थळी नेमकी परिस्थिती काय होती? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण

दरम्यान, अविष्कारच्या कथित प्रेमसंबंधांबाबतही परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. त्याचे मूळ गावातील एखाद्या महिलेसोबत संबंध होते की बारामतीतील एखाद्या महिलेसोबत, याबाबत वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर एका महिलेच्या पतीने अविष्कारवर गोळी झाडल्याची चर्चाही परिसरात सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र या चर्चेला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या चर्चांकडे केवळ तपासाच्या पार्श्वभूमीवर पाहणे आवश्यक आहे.

पोलिस तपासातून सत्य समोर येणार?

सूर्यनगरी परिसरात या घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. गोळीबार स्वतःकडून झाला की दुसऱ्या व्यक्तीकडून? पिस्तुलाचा स्रोत काय? घटनास्थळी नेमके काय घडले? गोळीबारापूर्वी अविष्कार कोणाच्या संपर्कात होता? या सर्व बाबींची उत्तरे तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

घटनेला चार-पाच दिवस उलटूनही पिस्तुलाचा स्रोत, गोळीबाराची नेमकी परिस्थिती आणि घटनेमागील कारणांबाबत अधिकृत तपशील समोर आलेला नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

घटनास्थळावरील पुरावे, पिस्तुलाचा स्रोत, संबंधित व्यक्तींची चौकशी तसेच उपलब्ध तांत्रिक व इतर पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

अविष्कार ढोलेच्या मृत्यूमागचे नेमके सत्य काय? हा प्रकार आत्महत्येचा होता की अन्य काही घडले? पिस्तुल आले कुठून? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून कधी समोर येतात, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button