बारामतीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात साजरा
७००हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; सामूहिक पठणाने निर्माण झाली सकारात्मक ऊर्जा

बारामतीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात साजरा
७००हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; सामूहिक पठणाने निर्माण झाली सकारात्मक ऊर्जा
बारामती वार्तापत्र
दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी भारतासह जगभरातील १०८ देशांमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग म्हणून बारामती शहरातही ‘जितो’ व ‘जैन सोशल ग्रुप बारामती’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास बारामती शहरातील सकल जैन समाजातील श्रावक-श्राविका, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच इतर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी दिगंबर आचार्य श्री गुप्तिनंदीजी महाराज साहेब व अन्य मुनिराजांच्या सान्निध्यात कार्यक्रम संपन्न झाला.
आपल्या प्रवचनामध्ये आचार्यश्रींनी नवकार महामंत्राचे महत्व सांगत, “संपूर्ण विश्वात सामूहिकरित्या नवकार महामंत्र जप होणे ही ऐतिहासिक कामगिरी आहे,” असे प्रतिपादन केले. नवकार महामंत्रामध्ये असलेली विश्वशांतीची ऊर्जा प्रत्येकाला अनुभवता आली, असेही ते म्हणाले.
या दिवशी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः उपस्थित राहून ‘नऊ संकल्प’ मांडत सर्व देशवासीयांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये दिगंबर समाजाचे चेअरमन श्री किशोर शेठ सराफ, स्थानकवासी समाजाचे चेअरमन श्री दिलीपजी धोका, आणि श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे चेअरमन श्री मनोजजी मुथा यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितोचे पॅटर्न मेंबर श्री प्रफुलजी गादिया यांनी केले. जैन सोशल ग्रुप बारामतीचे अध्यक्ष श्री चेतन व्होरा यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि नवकार महामंत्राचे महात्म्य विषद केले. सूत्रसंचालन जैन सोशल ग्रुपचे सचिव श्री विपुल शहा यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जितोचे पॅटर्न मेंबर श्री स्वप्निल मुथा तसेच जैन सोशल ग्रुप बारामतीचे श्री पंकज गदिया, निखिल मुथा, संतोष मेहता, महेश ओसवाल, मनोज धोका, प्रबोध शहा व राजकुमार दोशी यांनी विशेष मेहनत घेतली.
सुमारे ७००हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सामूहिक पठणामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, ज्याचा लाभ निश्चितच विश्वशांतीसाठी होईल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.