बारामतीत आता कचऱ्याची मनमानी खपवून घेतली जाणार नाही! पालिका पथक मैदानात
पहिल्यांदा ₹१००, पुन्हा पकडले तर ₹२००!

बारामतीत आता कचऱ्याची मनमानी खपवून घेतली जाणार नाही! पालिका पथक मैदानात
पहिल्यांदा ₹१००, पुन्हा पकडले तर ₹२००!
नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर ‘दंडाचा दणका’!
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील स्वच्छता अबाधित ठेवण्यासोबतच नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी बारामती नगरपालिकेने आता बेजबाबदार नागरिकांविरोधात धडक दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच नदीपात्रात कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेचे पथक प्रत्यक्ष जागेवर जाऊन कारवाई करत आहे.
या मोहिमेंतर्गत पहिल्यांदा कचरा टाकताना आढळून आल्यास ₹१०० दंड, तर त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केल्यास थेट ₹२०० दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे ‘कचरा कुठेही टाका आणि निघून जा’ अशी मानसिकता असलेल्या नागरिकांना आता पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
शहरातील नदी, रस्ते, सार्वजनिक परिसर आणि इतर ठिकाणी कचरा टाकल्यामुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच दुर्गंधी, प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पालिकेने प्रत्यक्ष पाहणी आणि दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे.
पालिकेच्या पथकाकडून कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाई टाळायची असेल तर नागरिकांनी आपला घरगुती व इतर कचरा उघड्यावर किंवा नदीपात्रात न टाकता पालिकेच्या घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्वच्छ बारामतीसाठी केवळ नगरपालिका प्रशासनाची कारवाई पुरेशी नसून नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘कचरा टाकू नका, शहर स्वच्छ ठेवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे.






