शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा ; इंदापूरमध्ये धरले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
कृषी कायदे माघे घेण्याची प्रमुख मागणी

शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा ; इंदापूरमध्ये धरले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
कृषी कायदे माघे घेण्याची प्रमुख मागणी
इंदापूर ; प्रतिनिधी
केंद्र सरकारने पारित केलेले नवे कृषी कायदे व महागाईविरोधात शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसने सक्रीय पाठिंबा दर्शवला असून महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण धरले आहे.
सदरील कृषी कायद्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाली पाहिजे. शेतकरी संघटनासह प्रमुख विरोधी पक्ष यांच्याशी चर्चा केली गेली पाहिजे. हे कायदे मंजूर झाल्यापासून देशभर पाचशेच्या वर शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. कॉंग्रेस पक्षाने कायद्याविरोधात वेळोवेळी मोर्चे, निदर्शने, स्वाक्षरी मोहिम राबवली आहे.दिल्लीला लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्या केंद्र सरकार पुढे मांडण्यासाठी निघालेल्या लाखो शेतकऱ्यांना विविध महामार्गावर अन्यायकारक पद्धतीने त्यांची अडवणूक करून केंद्र सरकार अतिशय क्रूर पद्धतीने आपल्या देशातील अन्नदात्याशी वागत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी भोंग यांनी यावेळी सांगितले.
तसेच केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे, पेट्रोल १०० रुपये लिटर गॅस सिलेंडर ८५० रुपये झाला आहे, इंधनावरील केंद्र सरकारने कर कमी करून लोकांना दिलासा द्यावा महागाई व इंधन दरवाढ कमी करावी.
शेतकऱ्यांना नको असलेले हे तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत, जोपर्यंत ते कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत काँग्रेस पक्ष लोकशाही मार्ग स्वीकारून लढत राहण्यासाठी तयार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असे भोंग यावेळी म्हणाले.
सदरील एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी पाठिंबा जाहीर केला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी भोंग,तालुका सरचिटणीस राहुल आचरे, नितीन राऊत, संतोष शेंडे,विलास गायकवाड,अरुण राऊत,सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप, बिभिषण लोखंडे आदींनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण धरुन या देशव्यापी आंदोलनास आपला पाठिंबा दर्शवला.