अजितदादांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाली; गुन्हेगारीच्या मुद्द्यावर पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचे पत्र
नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना

अजितदादांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाली; गुन्हेगारीच्या मुद्द्यावर पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचे पत्र
नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना
बारामती वार्तापत्र
बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवलेले एक पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या पत्रातून बारामतीतील वाढती गुन्हेगारी, नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, नगरपरिषदेचा कारभार आणि प्रशासनातील कथित मनमानीबाबत पवार कुटुंबीयांचे लक्ष वेधण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ‘दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती पोरकी झाली,’ अशी भावनिक व्यथाही या पत्रातून मांडण्यात आली आहे.
या पत्रात पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांना बारामतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘जरा बारामतीकडेही लक्ष द्या, ही नम्र विनंती,’ असे म्हणत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पत्रात बारामती नगरपरिषदेच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नगरपरिषदेचा कारभार असमाधानकारक पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांमध्ये भावना असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामतीत गुन्हेगारी वाढत असून, त्यामुळे नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘बारामती ही केवळ एक राजकीय जागा नाही; ती शरद पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबाने वर्षानुवर्षे घडवलेली विश्वासाची भूमी आहे,’ असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांनी बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील कथित मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रामागील व्यक्ती किंवा समूहाची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पत्रातील आरोप हे संबंधित नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना व दावे म्हणूनच पाहणे आवश्यक आहे. मात्र, या पत्रामुळे बारामतीतील गुन्हेगारी आणि नागरी प्रश्नांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.







