बारामतीत टायर चोरीचा अवघ्या एका तासात छडा! ₹५१ हजारांचे ८ टायर लंपास; तांत्रिक तपासाने दोन आरोपी ताब्यात
मिश्रीलाल डिस्ट्रीब्युटर्समधील चोरी; आरोपींनी यापूर्वी आणखी गुन्हे केले आहेत का, पोलिसांचा तपास सुरू

बारामतीत टायर चोरीचा अवघ्या एका तासात छडा! ₹५१ हजारांचे ८ टायर लंपास; तांत्रिक तपासाने दोन आरोपी ताब्यात
मिश्रीलाल डिस्ट्रीब्युटर्समधील चोरी; आरोपींनी यापूर्वी आणखी गुन्हे केले आहेत का, पोलिसांचा तपास सुरू
बारामती वार्तापत्र
फलटण रोड परिसरातील मिश्रीलाल डिस्ट्रीब्युटर्स या टायर विक्री दुकानातून ₹५१ हजार ४१४ रुपये किमतीचे ब्रीजस्टोन कंपनीचे तब्बल आठ टायर चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. गुन्हा दाखल होताच बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाची सूत्रे वेगाने हलवत अवघ्या एका तासात दोन संशयित आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजस मनोज मुधा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ते ४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने दुकानाच्या टेरेसवरील उघड्या दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर 195/60R16 आकाराचे चार आणि 165/70R14 आकाराचे चार, असे एकूण आठ ब्रीजस्टोन टायर चोरी करून नेण्यात आले.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर आणि पोलीस हवालदार सादिक काझी यांनी उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण सुरू केले. या तपासातून अवघ्या एका तासात गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणात रणजित विलास पवार (वय ३२, रा. कुरुबकर नर्सरी शेजारी, बारामती) आणि इरफान मणी तांबोळी (वय २२, रा. फलटण रोड, लहूजी नगर, बारामती) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींना ६ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयासमोर रिमांडकामी हजर करण्यात येणार आहे. चोरीस गेलेले टायर कुठे आहेत, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि आरोपींनी यापूर्वी अशाच स्वरूपाचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बारामती शहर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात आरोपी निष्पन्न झाल्याने व्यापारी वर्गातही पोलिसांच्या तांत्रिक तपासाकडे लक्ष वेधले गेले आहे.
पोलिसांचे आवाहन : व्यावसायिक आस्थापना, दुकाने आणि गोदामांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.






