क्राईम रिपोर्ट

डीपी चोरांचा रात्रीचा खेळ खल्लास! १७० किलो तांब्याच्या तारा हस्तगत; पाच आरोपी अटकेत!

विनानंबर पल्सरवरून चोरीसाठी आले; उसाच्या शेतात पळाले!

डीपी चोरांचा रात्रीचा खेळ खल्लास! १७० किलो तांब्याच्या तारा हस्तगत; पाच आरोपी अटकेत!

विनानंबर पल्सरवरून चोरीसाठी आले; उसाच्या शेतात पळाले

शिक्रापूर;प्रतिनिधि

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र (डीपी) लक्ष्य करून रात्रीच्या अंधारात चोरी करणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. डीपी खाली पाडायचे, त्यातील महागड्या तांब्याच्या तारा काढायच्या आणि अंधाराचा फायदा घेत पसार व्हायचे, असा या टोळीचा चोरीचा फंडा होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या टोळीचा डाव उधळला गेला आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून तब्बल आठ गुन्ह्यांची उकल केली असून, १७० किलो तांब्याच्या तारा हस्तगत केल्या आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख २९ हजार ५०० रुपये आहे.

उसाच्या शेतात लपले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री पोलीस हवालदार किरण ढुके आणि पोलीस अंमलदार लहानु बांगर हे अरणगाव परिसरात गस्त घालत असताना अरणगाव आणि उरळगाव गावच्या शिवेवर डीपी चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने परिसरात शोध सुरू केला असता विनानंबर प्लेटच्या पल्सर मोटारसायकलवरून जाणारे दोघे संशयास्पद आढळले.

पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताच दोघांनी मोटारसायकलचा वेग वाढवून पळ काढला. पोलिसांनी अडविल्यानंतर त्यांनी दुचाकी सोडून थेट उसाच्या शेतात धूम ठोकली. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी उसाच्या शेतात शोधमोहीम राबवली आणि अखेर सकाळी दोघांना पकडण्यात यश मिळवले.

चौकशीत आठ चोरींची कबुली; आणखी तीन साथीदारांचा सहभाग!

अटक करण्यात आलेल्या प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २७) आणि सुनील पोपट केदार (वय २५, दोघे रा. नांदूर, खंदारमळा, ता. संगमनेर) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी डीपीमधील तांब्याच्या तारा चोरण्यासाठी आल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता या चोरीच्या घटनांमध्ये आणखी तीन साथीदारांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून संदीप यशवंत काळे (वय २३), निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ (वय २१, दोघे रा. नांदूर, खंदारमळा, ता. संगमनेर) आणि राजेंद्र सोमनाथ वर्पे (वय ३२, रा. वरवंडी, थापलीवस्ती खंडोबा, ता. संगमनेर) यांना ताब्यात घेतले.

या पाचही आरोपींनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी रात्रीच्या वेळी विद्युत रोहित्र खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

१७० किलो तांब्याच्या तारा जप्त!

पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या १७० किलो तांब्याच्या तारा हस्तगत केल्या आहेत. या मुद्देमालाची किंमत तब्बल २ लाख २९ हजार ५०० रुपये आहे. या कारवाईमुळे शेतशिवारातील विद्युत रोहित्रांना लक्ष्य करणाऱ्या चोरीच्या घटनांचा तपास पुढे आला आहे.

पोलिसांना मदत करणाऱ्या सहा नागरिकांचा सन्मान!

या कारवाईत स्थानिक नागरिकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या उरळगाव येथील संतोष सात्रस, विनायक सात्रस, लहू हुजगे, निलेश सात्रस, काळुराम चोरमले आणि संजय चोरमले या सहा नागरिकांचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलिसांसोबत नागरिकांनीही सतर्क राहून सहकार्य केल्यास गुन्हेगारांवर कारवाई करणे अधिक प्रभावी ठरू शकते, असे सांगत पोलीस निरीक्षक यादव यांनी नागरिकांचे विशेष कौतुक केले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक फौजदार लहानु बांगर, पोलीस हवालदार किरण ढुके, रोहिदास पास्त्रे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे तसेच पोलीस अंमलदार भारत भोसले, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे आणि योगेश भंडारे यांनी सहभाग घेतला.

पुढील तपास किरण ढुके आणि भारत भोसले करीत आहेत.

एकीकडे शेतकऱ्यांच्या डीपीवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तर दुसरीकडे पोलिसांना मदत करणाऱ्या नागरिकांचा सन्मान! शिक्रापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे डीपी चोरट्यांना मोठा दणका बसला असून, नागरिकांच्या सतर्कतेचेही महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Back to top button