इंदापूर तहसील कचेरी आवारातून जप्त केलेला ट्रक वाळूसह चोरीला
इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इंदापूर तहसील कचेरी आवारातून जप्त केलेला ट्रक वाळूसह चोरीला
इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर प्रशासकीय इमारतीच्या आवारातून जप्त करून कार्यवाही साठी लावलेला टाटा कंपनीचा ट्रक ६ ब्रास वाळूसह चोरीला गेल्याबाबत सोपान बबन हगारे (वय ५१ वर्षे ) रा.भिगवण ता.इंदापूर,जि. पुणे यांच्या तक्रारी नुसार इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हकीकत अशी की, इंदापूर महसूल विभागाने अवैध वाळू उपसा करणार्या वाहनावर इंदापूर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सोपान हगारे व तलाठी आण्णाराव मुळे,चालक नितीन काळे यांनी दि.९ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजता तहसीलदार यांच्या तोंडी आदेशानुसार मौजे कालठण नं.२ रेडकेवस्ती जवळ कारवाई करत ३६ हजार २८८ रुपये किंमतीची ६ ब्रास वाळू सह रुपये १२ लाख किंमतीचा ट्रक ताब्यात घेत कारवाई केली होती.व सदरील ट्रक तहसील कचेरी आवारात लावला होता.दरम्यान दि.२० फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० ते दि.२१ फेब्रुवारीच्या दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान इंदापूर प्रशासकीय इमारतीच्या आवारातून जप्त करून कार्यवाहीसाठी लावलेला टाटा एल.पी कंपनीचा सहा टायर लाल रंगाचा ट्रक नं.एम.एच १२ एमव्ही ५७५१ व त्यामधील ६ ब्रास वाळू असा एकूण १२ लाख ३६ हजार २८८ रुपये किंमतीच्या वाळूसह ट्रकची चोरी झाली आहे.या प्रकरणी भादवि कलम ३७९ नुसार इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन तांबे हे करीत आहेत.
इंदापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या चारी बाजूंना संरक्षक भिंत असून बाहेर जाण्यासाठी एकमात्र मार्ग आहे तरी देखील आवारातून ट्रक सह वाळू चोरीला जाणे अत्यंत गांभीर्याची गोष्ट असून या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही? इमारतीच्या परिसरात सुरक्षारक्षक होता की हेतुपुरस्कर तेथून गायब झाला का कोणाच्या पाठिंब्याने सर्व प्रकार घडला असे अनेक प्रश्न तालुक्यातील नागरिकांमध्ये कुजबूजले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,की सदर गाडी मालासह चोरीस गेल्याचे माझ्या निदर्शनास आले असता मी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना इंदापूर पोलिसात कायदेशीर सदर वाहन क्रंमाकाचे वाहन चोरीस गेल्या प्रकरणी फिर्याद देण्याच्या सुचना केल्या असून आर टी ओ विभागीय कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करणार असून सदर वाहनाचा पोलिस यंत्रणेमार्फत शोध लावून दोषींवर कारवाई करणार आहोत. चोरीस गेलेले वाहन पुन्हा आम्ही ताब्यात घेऊ.भविष्यकाळात असे प्रकार टाळण्यासाठी वरिष्ठांशी बोलून कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणार आहोत असे सांगितले.
सदरील ट्रक आढळून आल्यास त्वरित संपर्क करण्याचे आवाहन इंदापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
संपर्क : ८१०८१९७८८८