उजनी धरण क्षेत्रातील गाळपेर जमीन ताब्यात घेण्याच्या निर्णयाला स्थगिती;भाजप नेते प्रवीण माने यांची माहिती
सोलर पॉवर एनर्जी व पर्यटन केंद्र या प्रकल्पांविषयी देखील बैठकीत चर्चा

उजनी धरण क्षेत्रातील गाळपेर जमीन ताब्यात घेण्याच्या निर्णयाला स्थगिती;भाजप नेते प्रवीण माने यांची माहिती
सोलर पॉवर एनर्जी व पर्यटन केंद्र या प्रकल्पांविषयी देखील बैठकीत चर्चा
इंदापूर
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळपेर जमीन स्थानिक शेतकरी जनावरांसाठी चारा उत्पादनासाठी पाणी उतरल्यावर लागवडीखाली आणत असतो. शेतकऱ्यांची ही लागवड बंद करून सदर गाळपेर जमिनीचा ताबा शासनाने घ्यावा याविषयीचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात येऊन याविषयीच्या नोटीस जलसंपदा विभागाने संबंधित शेतकरी बांधवांना पाठविल्या होत्या.
यामध्ये इंदापूर तालुक्याचे भाजप नेते प्रवीण माने,प्रदीप गारटकर यांनी यात लक्ष घालून मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या समवेत बैठक घेऊन सदर निर्णयास स्थगिती द्यावी, याविषयी आग्रही भूमिका मांडली. यावर विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, गाळपेर जमिनीवर अतिक्रमण हटाव नोटिसांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासह दुसरी महत्त्वाची गोष्ट ती अशी की महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सोलर पॉवर एनर्जी व पर्यटन केंद्र या प्रकल्पांविषयी देखील बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेला हा आम्हा सर्व इंदापूरमधील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व दिलासा देणारा निर्णय असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे इंदापूरच्या जनतेच्या वतीने विशेष आभार मानतो.
आजच्या या बैठकीच्या निमित्ताने दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल,भाजपचे नेते प्रदीप गारटकर, मोहन बापू दुधाळ व राजेश जामदार उपस्थित होते.






