‘कायद्यापेक्षा DJ मोठा नाही!’; नोटीस देऊनही DJ बंद केला नाही; बारामतीत 17 मालक-चालकांवर गुन्हा
उत्सवात ऊर्जा हवी, उन्माद नको!

‘कायद्यापेक्षा DJ मोठा नाही!’; नोटीस देऊनही DJ बंद केला नाही; बारामतीत 17 मालक-चालकांवर गुन्हा
उत्सवात ऊर्जा हवी, उन्माद नको!
बारामती वार्तापत्र
उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली कर्णकर्कश आवाजात DJ वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरोधात बारामती शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीत DJ आणि Sound System च्या अनियंत्रित वापरासंदर्भात तीन स्वतंत्र प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली असून, एकूण 42 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंबेडकर जयंती मिरवणुकीतील नियमभंगप्रकरणी 25 जणांवर गुन्हा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकीतील प्रकरणात वाहनासह संपूर्ण DJ Sound System जप्त, तर ईद-ए-मिलाद मिरवणुकीत पोलिसांच्या सूचना आणि प्रतिबंधात्मक नोटीसकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी 17 DJ मालक-चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेडकर जयंतीत 25 जणांवर गुन्हा
13 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त शिवाजी चौक, इंदापूर चौक, एस.टी. स्टँड परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी मोठ्या आवाजात DJ Sound System वाजविल्याने सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊन नागरिकांना त्रास होण्यासोबतच मानवी आरोग्य व सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 143/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 223 (अ) व 223 (ब) अंतर्गत 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अण्णाभाऊ साठे जयंतीत DJ वाहनासह जप्त
2 ऑगस्ट रोजी गुणवडी येथील ड्रायव्हर गल्ली परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात DJ वाजविण्यात आला. आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतर वाद होऊन फिर्यादीस मारहाण केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी गु.र.नं. 308/2026 अन्वये विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान टाटा कॅरियर वाहन क्रमांक MH-20-EG-5351 तसेच त्यावर बसविण्यात आलेले DJ Sound System, Speakers, Bass Boxes, Amplifiers, Mixer, Wiring आणि अन्य ध्वनिवर्धक साहित्य पंचांसमक्ष जप्त करण्यात आले.
वाहनातील alteration/modification, फिटनेस प्रमाणपत्र, परवाना आणि प्रत्यक्ष वापराबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पुढील तपासणी व कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
नोटीस देऊनही DJ बंद केला नाही; 17 जणांवर गुन्हा
26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी DJ मालक व चालकांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. धार्मिक अथवा संवेदनशील ठिकाणांसमोर आवाज वाढवू नये, मिरवणूक थांबवून DJ वाजवू नये, चिथावणीखोर गाणी किंवा ऑडिओ प्रसारित करू नयेत आणि ध्वनीमर्यादेचे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, प्रत्यक्ष मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी DJ बंद करण्याचे निर्देश देऊनही आदेशाचे पालन न केल्याच्या आरोपावरून 17 DJ मालक-चालकांविरुद्ध गु.र.नं. 346/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात CCTV, फोटो, व्हिडिओ, ई-साक्ष्य तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
आयोजकांसह DJ मालक-चालकांनाही इशारा
DJ भाड्याने दिला, दुसऱ्याने चालविला किंवा आयोजकाच्या सांगण्यावरून सुरू ठेवला, एवढ्यामुळे संबंधित व्यक्तीची कायदेशीर जबाबदारी संपत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्येक प्रकरणात संबंधित व्यक्तीची भूमिका, नियंत्रण, आदेशाची माहिती, आदेशाचे पालन किंवा अवज्ञा आणि उपलब्ध पुरावे यांचा स्वतंत्रपणे विचार करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ढोल-ताशा, लेझीमला प्रोत्साहन
कर्णकर्कश DJच्या स्पर्धेपेक्षा महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्यसंस्कृतीला प्राधान्य द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ढोल-ताशा, लेझीम, झांज, हलगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा शिस्तबद्ध वापर करून उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणुकांमधून व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, वाहतूक सुरक्षा, महिला सुरक्षा आणि सामाजिक ऐक्य यांसारखे सकारात्मक संदेश देण्याचेही पोलिसांनी आवाहन केले आहे.
कोणत्याही धर्माविरुद्ध कारवाई नाही
DJवरील कारवाई कोणत्याही धर्म, समाज किंवा उत्सवाविरोधात नसून, कर्णकर्कश आवाज, कायदेशीर आदेशाची अवज्ञा आणि सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांविरोधात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
वृद्ध नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, लहान मुले, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या शांततेचा व आरोग्याचा विचार करून उत्सव साजरे करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहर पोलिसांच्या पथकाने नोटीस बजावणी, बंदोबस्त, प्रत्यक्ष सूचना, पुरावे संकलन, गुन्हे दाखल करणे आणि DJ साहित्य जप्त करण्याची कार्यवाही केली.
“उत्सवात ऊर्जा असावी; उन्माद नसावा. आवाज असावा; मात्र नागरिकांना त्रास नसावा. कायद्याचे पालन करूनच उत्सव साजरा करा. कायद्यापेक्षा DJ मोठा नाही!”






