स्थानिक

अजितदादांची माया, आपुलकी अन् ऋणानुबंधांची आठवण; जय पवारांना राखी बांधताना महिला भावूक

‘दादा’ गेले, पण नातं कायम!

अजितदादांची माया, आपुलकी अन् ऋणानुबंधांची आठवण; जय पवारांना राखी बांधताना महिला भावूक

‘दादा’ गेले, पण नातं कायम!

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा नेते जय पवार यांच्या जनता दरबारात आज भावनिक वातावरण पाहायला मिळाले. स्व. अजितदादा पवार यांनी बारामतीकरांशी जपलेले आपुलकीचे, मायेचे आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आजही कायम असल्याची प्रचिती यावेळी आली.

जनता दरबारासाठी आलेल्या महिलांनी जय पवार यांच्या हातावर राखी बांधत अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. राखी बांधताना महिलांनी दादांसोबतचे आपले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांनी दिलेली आपुलकी याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

अजितदादांनी बारामतीतील नागरिकांशी केवळ राजकीय नव्हे, तर कौटुंबिक आणि आपुलकीचे नाते निर्माण केले होते. त्यांच्या जाण्यानंतरही हे नाते तितक्याच दृढतेने कायम असल्याचे या प्रसंगातून दिसून आले.

राखी बांधण्याच्या या भावनिक क्षणी महिलांच्या चेहऱ्यावर दादांच्या आठवणी स्पष्टपणे जाणवत होत्या. राखीच्या धाग्यातून जपलेले नाते आणि दादांच्या आठवणींनी उपस्थित वातावरण भावूक झाले. जय पवार यांनीही महिलांच्या या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा स्वीकार करत त्यांच्याशी संवाद साधला.

या प्रसंगामुळे जनता दरबाराला केवळ प्रश्न आणि निवेदनांचा कार्यक्रम न राहता जुन्या आठवणी आणि आपुलकीच्या नात्यांचा भावनिक स्पर्श लाभला.

Back to top button