५० वर्षांच्या निष्ठेलाच धक्का? जनता दरबारातील पत्राने बारामतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ!
‘आम्हाला या त्रासातून मुक्त करा’; ज्येष्ठ कार्यकर्त्याची वरिष्ठांकडे तक्रार

🔥 ५० वर्षांच्या निष्ठेलाच धक्का? जनता दरबारातील पत्राने बारामतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ!
‘आम्हाला या त्रासातून मुक्त करा’; ज्येष्ठ कार्यकर्त्याची वरिष्ठांकडे तक्रार
बारामती वार्तापत्र
बारामतीतील जनता दरबारात समोर आलेल्या एका तक्रारीच्या पत्राने सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तब्बल ५० वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने वरिष्ठांकडे तक्रार करत ‘आम्हाला या त्रासातून मुक्त करा’, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला मानसिक त्रास दिला जात असून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पक्षासाठी अनेक वर्षे निष्ठेने काम करूनही सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागत असल्याची भूमिका पत्रातून मांडण्यात आल्याचे माहिती सूत्रांकडून सांगितले जात आहे.
‘५० वर्षे पक्षासाठी दिली; आता न्यायासाठी वरिष्ठांकडे धाव?’
तक्रारदाराने आपण अनेक दशकांपासून पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाच्या माध्यमातून आपले सामाजिक आणि राजकीय आयुष्य घडल्याचे पत्रात नमूद केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून संबंधित कार्यकर्त्याला दिलासा द्यावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, जनता दरबारात देण्यात आलेले हे पत्र सर्वांसमोर वाचून चर्चा न करता वरिष्ठांनी आपल्याकडे घेतल्याची चर्चा आहे. यावेळी उपस्थित स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही संबंधित प्रकरणाची पार्श्वभूमी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्याचे बोलले जात आहे.
या पत्रामुळे बारामतीतील जुन्या आणि ज्येष्ठ पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.
‘पक्षासाठी आयुष्य दिलेल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाणार का?’
आता या तक्रारीची वरिष्ठांकडून कितपत गंभीर दखल घेतली जाणार? संबंधितांना काही समज दिली जाणार का? तक्रारदाराला न्याय मिळणार का? याकडे कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित व्यक्तीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नसून संबंधितांची बाजू समोर आल्यानंतरच वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.
बारामतीच्या राजकीय वर्तुळात या पत्रामुळे आता ‘निष्ठा विरुद्ध प्रभाव’ अशी चर्चा रंगू लागली असून, वरिष्ठ या तक्रारीवर नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






