भरड धान्यांच्या क्षेत्रात बारामतीची दमदार वाटचाल; २०२० पासून संशोधन, उत्पादन आणि मूल्यवर्धनाला चालना!

🌾 ३० ऑगस्ट : जागतिक भरड धान्य दिवस!
‘पौष्टिक अन्न–शाश्वत शेती’चा संदेश; भरड धान्यांमधून आरोग्य, पर्यावरण आणि शेतकरी उत्पन्नाला नवी दिशा
बारामती वार्तापत्र
भरड धान्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी आहारातील त्यांचे महत्त्व, शाश्वत शेती तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीतील त्यांची भूमिका याबाबत जनजागृती करण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी जागतिक भरड धान्य दिवस साजरा केला जातो.
भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, कुटकी/राळ, कोदो, सावा, कांगणी आणि चेना यांचा समावेश होतो. कमी पाणी, तुलनेने कमी कालावधी आणि विविध हवामान परिस्थितीत उत्पादन घेता येत असल्याने ही पिके विशेषतः कोरडवाहू व दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरतात.
🌾 बारामतीत २०२० पासून भरड धान्यांवर काम
२०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित होण्यापूर्वीच अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. राजेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२० पासून भरड धान्यांच्या क्षेत्रात काम सुरू करण्यात आले आहे.
धारवाड येथील कृषी विद्यापीठातून भरड धान्यांचे बियाणे आणून कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर त्यांची लागवड करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना ही बियाणे उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
🏭 प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाला चालना
अत्याधुनिक सुविधायुक्त भरड धान्य प्रक्रिया केंद्रामध्ये प्राथमिक व द्वितीय प्रक्रिया, आटा, रवा, विविध प्रीमिक्स, बेकरी पदार्थ, बिस्किटे, खारी, केक, पास्ता, सेवया, लाडू, पापड आदी विविध पदार्थ तयार केले जातात.
याशिवाय रेसिपी डेव्हलपमेंट, फूड टेस्टिंग, लेबलिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग सहाय्य अशा सुविधा महिला बचत गट, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांना एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
भरड धान्य प्रक्रिया व मूल्यवर्धनाबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देखील उपलब्ध करून दिले जाते.
💚 आरोग्यासाठीही भरड धान्य महत्त्वाचे
भरड धान्यांमध्ये तंतुमय पदार्थ, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक यांसारखी खनिजे आढळतात. अनेक भरड धान्ये नैसर्गिकरित्या ग्लुटेनमुक्त असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा उपयोग करता येतो. तंतुमय पदार्थांमुळे पचनास मदत होते आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना राहण्यास हातभार लागतो.
🌱 शेतकरी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर
कमी पाणी व संसाधनांमध्ये उत्पादन घेण्याची क्षमता, दुष्काळ व उष्णतेला तुलनेने अधिक सहनशीलता आणि विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याची संधी यामुळे भरड धान्ये शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीचे प्रभावी माध्यम ठरू शकतात.
‘पौष्टिक अन्न – शाश्वत शेती’ हा संदेश देणारी भरड धान्ये पोषण, अन्नसुरक्षा, जैवविविधता, पर्यावरणीय शाश्वतता आणि ग्रामीण उद्योजकतेसाठी महत्त्वाची ठरत आहेत.
— श्री. संतोष गोडसे, विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
— श्री. सुहास ननवरे, भरड धान्य प्रक्रिया तज्ञ






