शेतमालाचे प्रभावी विपणन ही काळाची गरज; राजेंद्र पवार यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
53 शेतकरी, 3 दिवसांचे प्रशिक्षण

शेतमालाचे प्रभावी विपणन ही काळाची गरज; राजेंद्र पवार यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
53 शेतकरी, 3 दिवसांचे प्रशिक्षण.
बारामती वार्तापत्र
शेतीमधील उत्पादनाबरोबरच शेतमालाचे प्रभावी विपणन आणि ब्रॅण्डिंग करणे ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र पवार यांनी केले.
दिनांक 24 ते 26 ऑगस्ट 2026 दरम्यान कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे आत्मा वाशिम अंतर्गत ‘सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती : उत्पादन, विपणन व ब्रॅण्डिंग’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणात वाशिम जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून 53 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये 15 महिला आणि 38 पुरुष शेतकऱ्यांचा समावेश होता.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीला KVK प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीची पार्श्वभूमी तसेच प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. श्री. संतोष गोडसे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
डॉ. रतन जाधव यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय या कृषिपूरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन केले. श्री. अल्पेश वाघ यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण, आवश्यक निविष्ठा तसेच परसबागेतील सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाविषयी माहिती दिली.
श्री. समाधान खूपसे यांनी PMFME योजना, सेंद्रिय शेतमालाची विक्री आणि ब्रॅण्डिंग याबाबत मार्गदर्शन केले. तर श्री. दत्तात्रय पवार यांनी जैविक खते व औषधांचे महत्त्व, त्यांची निर्मिती तसेच जैविक निविष्ठांच्या माध्यमातून पिकांमधील कीड व रोग नियंत्रण याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध विभागांना भेटी दिल्या. यामध्ये अत्याधुनिक स्मार्ट शेती तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले ऊस, केळी व तूर पिकांचे प्लॉट, मत्स्यपालन, नर्सरी, प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच गायी-म्हशींमधील अनुवंश सुधार प्रकल्प आदींची माहिती घेतली.
प्रशिक्षणाच्या समारोपावेळी श्री. राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पारंपरिक शेतीचे महत्त्व, सेंद्रिय शेती आणि त्यातून उत्पादित होणाऱ्या शेतमालाचे प्रभावी विपणन यावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सदर प्रशिक्षण प्रकल्प संचालक, आत्मा वाशिम यांच्या अंतर्गत आणि आत्माचे जिल्हा व्यवस्थापक श्री. जयप्रकाश लव्हाळे यांच्या देखरेखीखाली कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे यशस्वीरित्या पार पडले.






