राजकीय

बारामतीत लक्ष्मण हाके आक्रमक; ओबीसी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बड्या नेत्यांना घेरलं

‘ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झालाय’;

बारामतीत लक्ष्मण हाके आक्रमक; ओबीसी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बड्या नेत्यांना घेरलं

‘ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झालाय’;

बारामती वार्तापत्र 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अनेक राजकीय नेत्यांकडे ओबीसी अथवा कुणबी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर हाके यांना याबाबत विचारण्यात आले. त्यावर “सुप्रिया सुळेंचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही, मला माहिती नाही; मात्र पवार कुटुंबीयांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र असल्याची माहिती आहे,” असा दावा त्यांनी केला.
यापुढे बोलताना हाके यांनी “रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे, ही माझी पक्की माहिती आहे,” असे म्हटले. तसेच मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे भविष्यात कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आरक्षणाच्या जागेवर निवडणूक लढवू शकतात, असा दावा त्यांनी केला.
हाके यांनी यावेळी महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची नावे घेतली. बबनराव शिंदे यांचे पुत्र विक्रम शिंदे व रणजित शिंदे, भालके, आवताडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, कर्डिले, गाडे, अंबादास दानवे तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा त्यांनी केला.

“फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो. आमदार, खासदार आणि मंत्रीपदावर ज्यांची मक्तेदारी राहिली आहे, अशा राजकीय घराण्यांतील लोकांकडे जर मागासवर्गीयांचे प्रमाणपत्र असेल, तर त्यांच्या स्पर्धेत गावगाड्यातला ओबीसी टिकेल का?” असा सवाल हाके यांनी उपस्थित केला.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी “ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झाला आहे,” असा आरोप केला. मंडल आयोग, कालेलकर आयोग आणि गायकवाड आयोगाच्या संदर्भातील मुद्दे उपस्थित करत आरक्षणाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, छगन भुजबळ यांना आपले नेते मानत असल्याचे सांगत हाके यांनी ओबीसी नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.

हाके यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि राजकीय नेत्यांच्या जात प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

महत्त्वाचे : हाके यांनी केलेले प्रमाणपत्रांबाबतचे दावे हे त्यांचे वैयक्तिक दावे आहेत. संबंधित नेत्यांकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अथवा कागदपत्रे समोर आल्यानंतरच या दाव्यांची वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

Back to top button