लेखन अन् अभिनयाची दुहेरी कमाल; सान्वी महाडीकने उजळवलं बारामतीचं नाव
२,५०० विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत सान्वीची बाजी

लेखन अन् अभिनयाची दुहेरी कमाल; सान्वी महाडीकने उजळवलं बारामतीचं नाव
२,५०० विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत सान्वीची बाजी
बारामती | प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सान्वी अमरेन्द्र महाडीक हिने बाल रंगभूमी परिषद आयोजित स्व. मनीषाताई भाऊसाहेब भोईर नाट्यछटा स्पर्धा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे येथे झालेल्या विभागीय अंतिम फेरीत इयत्ता आठवी व नववीच्या गटात सान्वीने द्वितीय क्रमांक पटकावला.
विशेष म्हणजे, सान्वीने सादर केलेली ‘माझा डाएट उद्यापासून सुरू’ ही नाट्यछटा तिची स्वतःची स्वलिखित लेखनकृती आहे. दैनंदिन जीवनातील ‘डाएट’ या विषयाकडे विनोदी आणि मिश्कील पद्धतीने पाहणाऱ्या या नाट्यछटेत कल्पक मांडणी, प्रभावी संवादफेक, आत्मविश्वासपूर्ण अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग यामुळे तिने परीक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेच्या विविध २६ केंद्रांवर २,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून सुमारे २६० विद्यार्थी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. सान्वी सहभागी असलेल्या इयत्ता आठवी व नववीच्या गटात तब्बल ४६५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या चुरशीच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठत सान्वीने द्वितीय क्रमांक मिळवला.
सान्वीच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्राताई पवार यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. कलागुणांच्या जोरावर शाळेसह बारामतीचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांनी सान्वीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अंतिम फेरीसाठी आकाश थिटे, निकिता वाणी, स्वप्नील खंबायत, चैताली जाधव आणि प्रीती केसकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
सान्वीच्या यशामागे शाळेतील ज्योती दिसले मॅडम आणि अर्चना देव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका तनुश्री गोरे आणि विभागप्रमुख लीला शेट्टी यांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. तिची आई अॅड. प्रिया अमरेन्द्र महाडीक यांनीही तयारीपासून अंतिम सादरीकरणापर्यंत विशेष मार्गदर्शन केले.
पारितोषिक वितरण समारंभास बाल रंगभूमी परिषद (मध्यवर्ती, मुंबई) यांच्या अध्यक्षा अॅड. नीलिमाताई शिर्के-सामंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची विशेष उपस्थिती होती.
शेकडो स्पर्धकांच्या चुरशीत विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावत सान्वीने विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी तसेच बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन होत आहे.






