बारामतीत राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिसचा थरार! ८ विभागांतील १०० खेळाडूंचा सहभाग; राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड!
देवास येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खेळाडू सज्ज!

बारामतीत राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिसचा थरार! ८ विभागांतील १०० खेळाडूंचा सहभाग; राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड!
देवास येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खेळाडू सज्ज!
बारामती वार्तापत्र
क्रीडा क्षेत्रात बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा (१९ वर्षांखालील मुले व मुली) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. महाराष्ट्रातील आठ विभागांमधून तब्बल १०० खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची देवास (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि पुणे सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते टॉस करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी नाना होळकर होते.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी बारामतीतील अत्याधुनिक क्रीडा सुविधांचा खेळाडूंनी सरावासाठी आणि विविध स्तरांवरील स्पर्धांसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच खेळाडूंनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, अशा शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठ विभागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. वैयक्तिक तसेच सांघिक गटात खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
मुलींच्या वैयक्तिक गटात बुलढाण्याची भक्ती क्षीरसागर प्रथम!
१९ वर्षांखालील मुलींच्या वैयक्तिक गटात बुलढाण्याच्या भक्ती संदीप क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक पटकावला. सांगलीच्या पूर्वा सुनील सराटे हिने द्वितीय, बुलढाण्याच्या सोनाल गणेश खर्चे हिने तृतीय, बुलढाण्याच्याच श्रावणी गजानन जोगदंड हिने चतुर्थ, तर रायगडच्या दिव्या मनोज मोकळ हिने पाचवा क्रमांक मिळवला.
मुलांच्या वैयक्तिक गटात धाराशिवचा सुयश आडे अव्वल!
१९ वर्षांखालील मुलांच्या वैयक्तिक गटात धाराशिवच्या सुयश संजय आडे याने प्रथम क्रमांक पटकावला. साताऱ्याच्या अनुराग पुरुषोत्तम पाटील याने द्वितीय, पुण्याच्या अनुराग पुरुषोत्तम पाटील याने तृतीय, जळगावच्या सनेश किशोर पाटील याने चतुर्थ, तर नांदेडच्या हर्षवर्धन विठ्ठल पाटील याने पाचवा क्रमांक मिळवला.
सांघिक स्पर्धेत लातूर आणि अमरावती विभागाची बाजी!
मुलांच्या सांघिक स्पर्धेत लातूर विभागाने प्रथम, छत्रपती संभाजीनगर विभागाने द्वितीय, तर अमरावती विभागाने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या सांघिक स्पर्धेत अमरावती विभागाने प्रथम, मुंबई विभागाने द्वितीय, तर छत्रपती संभाजीनगर विभागाने तृतीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले, तर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी आभार मानले.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी संतोष लवटे, सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे सचिव विल्सन ॲड्रीज, प्रशांत रणदिवे, दादासो आव्हाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू सुहास हाडे, अभिमन्यू इंगोले, तांत्रिक पंच मंडळी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
बारामतीच्या क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे राज्यातील नवोदित सॉफ्ट टेनिस खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. आता राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.






