क्रीडा

अजितदादांच्या स्मृतींना ७,२७० धावपटूंचे अभिवादन! बारामतीत तीन दिवस पॉवर मॅरेथॉनचा जल्लोष!

७,२७० धावपटूंचा विक्रमी सहभाग; १० लाखांची पारितोषिके, ३० स्टॉल्सचा स्पोर्ट्स एक्स्पो आणि तीन दिवस मनोरंजनाची मेजवानी!

अजितदादांच्या स्मृतींना ७,२७० धावपटूंचे अभिवादन! बारामतीत तीन दिवस पॉवर मॅरेथॉनचा जल्लोष!

७,२७० धावपटूंचा विक्रमी सहभाग; १० लाखांची पारितोषिके, ३० स्टॉल्सचा स्पोर्ट्स एक्स्पो आणि तीन दिवस मनोरंजनाची मेजवानी!

बारामती वार्तापत्र 

स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची देणाऱ्या ‘इंडियाज् आयकॉनिक बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६’ चे चौथे पर्व यंदा तब्बल तीन दिवस रंगणार आहे. २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेला हा क्रीडा महोत्सव धावपटूंसह बारामतीकरांसाठीही मोठी पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, यंदा तब्बल ७ हजार २७० धावपटूंनी नोंदणी केली असून, १० लाख रुपयांची पारितोषिके आणि ३० स्टॉल्सचा भव्य स्पोर्ट्स एक्स्पो हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि भक्कम पाठिंब्यातून सुरू झालेली बारामती पॉवर मॅरेथॉन यंदा त्यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आली आहे. क्रीडा, आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक सहभागाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून अजितदादांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सकाळी १० वाजता स्पोर्ट्स एक्स्पो आणि बिब डिस्ट्रीब्यूशनचा शुभारंभ होणार आहे. या एक्स्पोमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा ब्रँड्सचे तब्बल ३० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
२७ आणि २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक्स्पो सुरू राहणार आहे. यासोबतच विविध गेम्स, मॅजिक शो, फूड स्टॉल्स आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानीही नागरिकांना अनुभवता येणार आहे.

२९ नोव्हेंबरला पहाटेपासून धावण्याचा थरार!
रविवारी, २९ नोव्हेंबर रोजी रेल्वे स्टेशन ग्राउंड येथून उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे.

स्पर्धेची वेळ पुढीलप्रमाणे :
४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन – पहाटे ४ वाजता
२१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन – सकाळी ६ वाजता
१० किलोमीटर रन – सकाळी ६.३० वाजता
५ किलोमीटर फन रन – सकाळी ७.५५ वाजता

अनुभवी धावपटूंपासून नवोदित खेळाडू, युवक-युवती आणि कुटुंबीयांपर्यंत सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी चार प्रकारांत स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
१० लाखांची बक्षिसे; शाळा-महाविद्यालयांचाही गौरव!
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. चारही स्पर्धा प्रकारांमध्ये विविध वयोगटांनुसार प्रथम तीन क्रमांकांच्या धावपटूंचा गौरव करण्यात येणार आहे. सर्वाधिक सहभाग नोंदविणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि रनिंग ग्रुप्सनाही ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

२०२३ मध्ये अवघ्या ७२७ धावपटूंच्या सहभागाने सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये यंदा तब्बल ७,२७० धावपटूंनी नोंदणी केली आहे. अवघ्या चार वर्षांत सहभागी धावपटूंच्या संख्येत झालेली ही लक्षणीय वाढ बारामतीतील वाढत्या फिटनेस संस्कृतीचे चित्र अधोरेखित करणारी आहे.

वर्ल्ड ॲथलेटिक्सच्या निकषांनुसार प्रमाणित मार्ग आणि AIMS च्या सहकार्यामुळे या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धावपटूंसाठी वैद्यकीय सुविधा, हायड्रेशन सपोर्ट, आपत्कालीन मदत, स्वयंसेवक, आकर्षक फिनिशर मेडल्स आणि पौष्टिक नाश्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या तीन दिवसीय महोत्सवामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्रासोबतच पर्यटन, स्थानिक व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आणि आर्थिक उलाढालीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Back to top button