स्थानिक

बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसीत आगीचा कहर! सम्यक प्लास्टिक कंपनी जळून खाक; १० लाखांचे नुकसान!

शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज; दोन अग्निशामक बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण, सुदैवाने जीवितहानी टळली!

बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसीत आगीचा कहर! सम्यक प्लास्टिक कंपनी जळून खाक; १० लाखांचे नुकसान!

शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज; दोन अग्निशामक बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण, सुदैवाने जीवितहानी टळली!

पणदरे ; प्रतिनिधि

बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी परिसरात आज दुपारी आगीच्या भीषण घटनेने एकच खळबळ उडाली. येथील सम्यक प्लास्टिक कंपनी आणि गोडाऊनला अचानक आग लागल्याने कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे मालक उज्वल माणिकचंद शहा यांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कंपनी बंद होती. कंपनीला कुलूप असल्याने आत कोणीही कामगार उपस्थित नव्हते. अशातच दुपारच्या सुमारास कंपनीतून धूर आणि आगीचे लोळ दिसू लागले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. कंपनीतील प्लास्टिकचा कच्चा माल आणि इतर साहित्याने पेट घेतल्याने आगीची तीव्रता वाढली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच बारामती औद्योगिक विभागाचा अग्निशामक बंब आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही अग्निशामक बंबांच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग अधिक पसरून मोठे नुकसान होण्याचा धोका टळला.

दरम्यान, कुलूपबंद असलेल्या कंपनीला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि गोडाऊनमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास साळवी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी मदतीचा हात दिला.

विशेष म्हणजे, दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कंपनीतील कामगार उपस्थित नसल्याने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पणदरे एमआयडीसीतील या आगीच्या घटनेमुळे औद्योगिक परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे नेमके कारण काय, याबाबत आता पुढील तपास आणि पाहणीकडे लक्ष लागले आहे.

Back to top button