स्थानिक

बारामतीच्या भूलतज्ञ संघटनेचा राष्ट्रीय स्तरावर डंका! दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव; वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा!

CPR प्रशिक्षण अन् जनजागृतीच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर पोहोच!

बारामतीच्या भूलतज्ञ संघटनेचा राष्ट्रीय स्तरावर डंका! दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव; वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा!

CPR प्रशिक्षण अन् जनजागृतीच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर पोहोच!

बारामती वार्तापत्र 

बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी समोर आली असून, इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेशिऑलॉजिस्ट्स (ISA) च्या बारामती शाखेने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. वैद्यकीय सेवेसोबतच सार्वजनिक आरोग्य जनजागृती, CPR प्रशिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बारामती शाखेला २०२६ चे दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या यशामुळे बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ISA चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नवीन जी. मल्होत्रा यांनी दिल्ली येथे या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये बारामती शाखेला ‘Best City Branch – Small Category’ या विभागातील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘Public Awareness Award – Special Consolation Prize’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

आरोग्य जनजागृतीच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

बारामती ISA शाखेने गेल्या काही वर्षांत केवळ वैद्यकीय उपचारांपुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक आरोग्यसेवेचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, CPR अर्थात हृदय-श्वसन पुनरुज्जीवन प्रक्रियेचे प्रशिक्षण देणे, रुग्णसुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविणे, अशा अनेक माध्यमांतून संघटनेने समाजहिताचे कार्य केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी CPR प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव समाजातील विविध घटकांना करून देण्याचे काम संघटनेने सातत्याने केले आहे. याच सामूहिक प्रयत्नांची आणि सामाजिक बांधिलकीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत दोन पुरस्कारांनी बारामती शाखेचा गौरव करण्यात आला आहे.

ज्येष्ठ भूलतज्ञ डॉ. अशोक तांबे यांचे मार्गदर्शन मोलाचे

या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ भूलतज्ञ व प्रमुख मार्गदर्शक डॉ. अशोक तांबे म्हणाले की, बारामती शाखेचे सर्व सदस्य जनजागृती आणि जीवनसंजीवनी प्रशिक्षणाचे कार्य अत्यंत उत्तम पद्धतीने करत आहेत. समाजातील कोणत्याही घटकाला असे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास संघटनेचे सदस्य निश्चितच मदत करतील. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी संघटनेचे सदस्य समाजासाठी सदैव तत्पर असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संपूर्ण टीमच्या एकजुटीचे यश – डॉ. सुजित अडसुळ

ISA चे Governing Council Member, SAMS असलेले डॉ. सुजित अडसुळ यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, हे दोन्ही पुरस्कार संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहेत. जीवनसंजीवनी प्रक्रियेचे प्रशिक्षण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी बारामती भूलतज्ञ संघटना कटिबद्ध आहे. या कार्यामागे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. संजीव कोल्हटकर आणि डॉ. अशोक तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य लाभले आहे.

भविष्यातही जनजागृतीचे कार्य अधिक जोमाने करणार

ISA बारामती शाखेचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब वायसे आणि सचिव डॉ. निकिता मेहता यांनी या पुरस्कारांबद्दल समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मान्यता संघटनेच्या कार्याला नवी प्रेरणा देणारी आहे. भविष्यातही सार्वजनिक आरोग्य जनजागृती, CPR प्रशिक्षण आणि सामाजिक आरोग्यसेवेचे उपक्रम अधिक जोमाने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य

या यशामध्ये महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश तगडपल्ले, उपाध्यक्ष डॉ. दिलीप देसाई, सचिव डॉ. शीतल दलाल, तसेच डॉ. सौरभ बर्डे, डॉ. सचिन चांदोलकर, डॉ. अविनाश भोसले आणि डॉ. शिल्पा तिवसकर यांच्यासह राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. बारामती शाखेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यातील पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

बारामती ISA शाखेचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब वायसे, सचिव डॉ. निकिता मेहता, Governing Council Member डॉ. सुजित अडसुळ यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे या राष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य जनजागृती यांचा सुंदर संगम साधत बारामतीच्या भूलतज्ञ संघटनेने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेला हा सन्मान शहराच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरला आहे.

Back to top button