बारामतीत रिक्षाचालक विरुद्ध बाइक टॅक्सी संघर्ष पेटणार! मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन!
बाइक टॅक्सी चालकांची कायदेशीर नोंदणी झाली आहे का?

बारामतीत रिक्षाचालक विरुद्ध बाइक टॅक्सी संघर्ष पेटणार! मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन!
बाइक टॅक्सी चालकांची कायदेशीर नोंदणी झाली आहे का?
बारामती वार्तापत्र
बारामतीत रिक्षाचालक विरुद्ध बाइक टॅक्सी असा संघर्ष आता चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरात सुरू असलेल्या रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेला विरोध करत रिक्षाचालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून, मागण्या मान्य न झाल्यास १ डिसेंबर २०२६ पासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बारामतीतील प्रवासी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बारामती शहरात सुरू असलेल्या रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. आधीच वाढता खर्च, इंधन दर आणि व्यवसायातील स्पर्धेमुळे अडचणीत असलेल्या रिक्षाचालकांच्या रोजगारावर या सेवेमुळे गदा येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना तसेच शहर व तालुका ऑटो रिक्षा महासंघ, बारामती यांनी बाइक टॅक्सी सेवेला तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यंत्रणेला निवेदन देण्यात आले आहे.
बाइक टॅक्सी चालकांची कायदेशीर नोंदणी झाली आहे का? वाहनांना आवश्यक परवाने आहेत का? प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमा आणि इतर नियमांचे पालन केले जाते का? याची सखोल तपासणी करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा १ डिसेंबरपासून बारामतीतील रिक्षाचालक बेमुदत संपावर जातील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
आता रिक्षाचालकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन काय भूमिका घेणार? रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेबाबत निर्णय होणार की बारामतीकरांना रिक्षा बंदचा सामना करावा लागणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






